ऍड. सूरज महारतळे यांना “कृषीरत्न पुरस्कार”
मुंबई येथील मनुष्यबळ विकास अकादमीतर्फे पुरस्कार जाहीर
जब्बार चीनी, वणी: वणी येथे वकिली व्यवसाय करणारे व प्रगतशील शेतकरी सूरज महारतळे यांना कृषीरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार मुंबई येथील मनुष्यबळ विकास अकादमीतर्फे देण्यात आला आहे. सप्टेंबर महिन्यात होणा-या राज्यस्तरीय गुणीजन गौरव महासंमेलनात या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.
2019-2020 या वर्षात ऍड. सूरज महारतळे यांनी पारंपरिक पद्धतीच्या शेतीला फाटा देत आधुनिक शेती पद्धतीने कमी जागेत जास्त उत्पादन घेण्याचा प्रयोग यशस्वी केला होता. त्यांनी अर्ध्या एकरामध्ये इजराईल पद्धतीने पॉलीहाऊस तयार करून त्यातून भरगोस उत्पन्न घेतले होते.
या कार्याबाबत त्यांचा सप्टेंबर महिन्यात मुंबई इथे होत असलेल्या राज्यस्तरीय गुणीजन गौरव महासंमेलन 2020 या कार्यक्रमात सन्मानचिन्ह, गौरवपदक, मानपत्र, महावस्त्र बॅच, गौरवमूर्ती मानाचा फेटा देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.