जब्बार चीनी, वणी: शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर तसेच सर्वोदय चौक येथील रहिवाशी असलेले डॉ. कुमार आंबटकर यांचे सोमवारी सकाळी 11 वाजता नागपूर येथे हृदयविकाराच्या धक्याने निधन झाले. त्यांच्यावर सोमवारीच नागपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यावर अचानक काळाने घाला घातल्याने वैद्यकीय श्रेत्रात व शहरात हळहळ व्यक्त होत आहे
26 ऑगस्ट रोजी डॉ. कुमार आंबटकर यांनी कुटुंबासह कोविडची चाचणी केली असता त्यात ते पॉजिटिव्ह आले होते. त्यांच्यात कोविडचे सौम्य लक्षणं असल्याने त्यांना होम आयसोलेट करण्यात आले होते. मात्र खबरदारी म्हणून 27 ऑगस्टला त्यांना नागपूर येथील सिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. रिकव्हर होत असल्याने त्यांना सुट्टी देखील मिळणार होती.
दिनांक 4 सप्टेंबर रोजी त्यांना हृदयविकाराचा सौम्य धक्का आला. त्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. रविवारी दिनांक 13 सप्टेंबर रोजी त्यांना पुन्हा हृदयविकाराचा धक्का आला. त्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर झाली. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच अखेर सकाळी 11 वाजताच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर नागपूर येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले.
मुळचे मांगरुड येथील रहिवाशी असलेले डॉ. कुमार आंबटकर यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1977 साली त्यांनी वणी येथे क्लिनिक सुरू केले. तेव्हापासून त्यांची वैद्यकीय सेवा सुरू होती. एक मनमिळावू व्यक्तीमत्व म्हणून त्यांची शहरात ओळख होती. त्यांच्या अचानक जाण्याने वैद्यकीय क्षेत्र आणि शहरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्यामागे पत्नी, 2 मुलं, सून, नातवंड असा बराच आप्त परिवार आहे.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)