कुंभा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अरविंद ठाकरे
उपसरपंच पदी गजानन ठाकरे, गावाने दिली परिवर्तनाला साथ
नागेश रायपुरे, मारेगाव: अवघ्या तालुक्याचे लक्ष वेधलेल्या ग्रामपंचायत कुंभा च्या सरपंचपदी अरविंद ठाकरे यांची तर उपसरपंच पदी गजानन ठाकरे यांची निवड झाली. निवडणुकीत अरविंद ठाकरे यांच्या पॅनलला 9 पैकी 6 जागांवर विजय मिळाला होता. त्यामुळे त्यांच्या सरपंचपदाची केवळ औपचारिकता बाकी होती.
गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले व सर्वसामान्याच्या मदतीसाठी एका हाकेवर धावून जाणारे अरविंद ठाकरे यांनी यावर्षी राजकारणाच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णय़ घेतला. कुंभा येथे नरेंद्र ठाकरे पाटील गटाची सत्ता होती. राजकारणात मुरलेल्या गटापुढे नवखे असलेले अरविंद ठाकरे यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवली गेली. गावाची ब्लू प्रिंट जाहीर करत त्यांनी एक संधी देण्याची कुंभावासियांना साद घातली. गावानेही परिवर्तनाला पसंती देत अरविंद ठाकरे गटाला भरगोस मतानी विजयी केले.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अरविंद ठाकरे यांच्या परिवर्तन गटाला 9 पैकी 6 जागांवर विजय मिळाला. आरक्षण जाहीर झाल्यानंतर अरविंद ठाकरे हे सरपंच बनण्याची केवळ औपचारिकता बाकी होती. अखेर सोमवारी सरपंचपदाच्या झालेल्या निवडणुकीत अरविंद ठाकरे यांची सरपंचपदी व गजानन ठाकरे यांची उपसरपंचपदी निवड झाली.
गावक-यांना दिलेले आश्वासन पूर्ण करणार – अरविंद ठाकरे
गावात अपेक्षीत विकास झाला नाही. त्यामुळे कोणताही संबंध नसताना मला राजकारणात उतरावे लागले. नवखा असतानाही गावक-यांनी माझ्या पॅनलवर विश्वास दाखवला बहुमताने निवडून दिले. अनेक योजना गावात राबवायच्या आहेत. रस्ते, पाणी, यासारख्या प्राथमिक सोयीसुविधेसह सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक इत्यादी क्षेत्रातही गावाचा विकास करायचा आहे. तरुणाईसाठी विविध योजना राबवायच्या आहेत. मतदारांनी जो विश्वास दाखवला आहे त्याबाबत त्यांचे कोटी कोटी आभार. त्यांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही व निवडणुकीआधी दिलेले आश्वासन पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार.
– अरविंद ठाकरे, नवनिर्वाचित सरपंच
ग्रामपंचायतीत सरपंच अरविंद वसंतराव ठाकरे, उपसरपंच गजानन ठाकरे राहणार असून सदस्य अश्विता अरविंद ठाकरे, सुचिता अनंता महाजन, गंगा विनोद ठाकरे, विनायक महादेव गाऊत्रे, रामचंद्र किनाके, सुषमा ठेपाले, वर्षा बोथले राहणार आहेत.
हे देखील वाचा:
पहाटे पहाटे मारेगाव येथे पोलिसांनी आवळल्या दारु तस्करांच्या मुसक्या