आत्महत्या नव्हे खून, मर्डर मिस्ट्रीचा लागला छडा

विवाहित तरुणाचा केला गळा आवळून खून, दोघे गजाआड

निकेश जिलठे, वणी: गुरुवारी सकाळी कुंभ्याजवळ बाबईपोड येथील भीमराव तुकाराम मडावी (31) या विवाहित तरुणाचा ओढणीच्या साहाय्याने आत्महत्या केल्याच्या अवस्थेत मृतदेह आढळला. प्रथमदर्शनी ती आत्महत्या वाटत असली तरी ती आमहत्या नसून खून असल्याचे लगेच स्पष्ट झाले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. अखेर पोलिसांनी अवघ्या 24 तासांच्या आत या प्रकरणाचा छडा लावत दोन आरोपींना गजाआ़ड केले. संतोष उर्फ जमादार पडोळे व त्याचा मित्र आरोपी गोलू पुसदेकर, असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत.

प्राप्त माहितीनुसार, मृत भीमराव मडावी (31) हा बाबईपोड ता. मारेगाव येथील रहिवासी होती. त्याला दारू पिण्याची सवय होती. चार दिवसांआधी त्याची पत्नी माहेरी गेली होती, तेव्हापासून घरी तो एकटाच होता. गुरुवारी रात्री तो गावापासून जवळच असलेल्या कुंभा येथे पायी गेला होता. मात्र रात्री तो परत आलाच नाही. त्याच्या वडिलांना तो पत्नीला भेटायला सासरी गेला असावा असे वाटले. मात्र दुस-या दिवशी शुक्रवारी दिनांक 25 ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास त्याचा मृतदेहच गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती तातडीने मारेगाव पोलिसांना देण्यात आली. ही आत्महत्या नसून खून असल्याचे स्पष्ट झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन एसडीपीओ गणेश किंद्रे यांनी या प्रकरणात जातीने लक्ष घातले व अवघ्या 24 तासांच्या आत पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

असा झाला भीमरावचा खून
गुरुवारी दिनांक 24 ऑक्टोबरच्या रात्री भीमराव हा कुंभा येथे पायीच गेला होता. तिथे आरोपी संतोष उर्फ जमादार पडोळे व त्याचा मित्र आरोपी गोलू पुसदेकर हे दोघे देखील उपस्थित होते. तिथे भीमरावचा संतोष पडोळे सोबत वाद झाला. वाद वाढत गेला. वादानंतर रात्री उशिरा भीमराव हा गावी परतत होता. यावेळी दोन्ही आरोपी भीमरावच्या पाळतीवर होते. त्या दोघांनी सुनसान जागी भीमरावला गाठले. अंधाराचा फायदा घेत आरोपी संतोषने ओढणीच्या साहाय्याने भीमराव याचा गळा आवळून खून केला. त्यानंतर गोलुच्या मदतीने उचलून संतोषने आत्महत्येचा बनाव रचला.

अवघ्या 24 तासांच्या आत छडा
पोलिसांना परिस्थितीजन्य पुराव्यावरून ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे कळले. त्यांनी चौकशी केली असता त्यांना रात्री भीमरावचा दोघांशी वाद झाल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी आरोपी संतोष व गोलू यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. आधी या दोघांनी तो मी नव्हेच अशी भूमिका घेतली. मात्र पोलिसी खाक्या मिळताच ते दोघेही पोपटासारखे बोलू लागले. त्यांनी झालेली सर्व घटना कथन केली. या घटनेला अनैतिक संबंधाची किनार आहे का? याचा तपास देखील पोलीस करीत आहे. सदर कारवाई एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात व ठाणेदार संजय सोळंखे यांच्या आदेशाने पोउनि प्रमोद जिद्देवार, अजय वाभीटकर, एसडीपीओ पथकातील इकबाल शेख, विजय वानखेडे यांनी केली.

Comments are closed.