कुंभारखणी (इजासन) ग्रामपंचायत कार्यालय रामभरोसे

ग्रामसेवक कार्यलयात सतत गैरहजर, घरी जाऊन काम करण्याची नामुष्की

0

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील कुंभारखणी (इजासन) ग्रामपंचायतीचे कार्यालय नेहमीच कुलूपबंद असते. त्यामुळे गावक-यांना विविध कागदपत्रे काढण्यास त्रास होत आहे. जेव्हा ही गावकरी कार्यालयात जातात तेव्हा कार्यालय बंदच आढळून येते. त्यामुळे विविध प्रमाणपत्रासाठी गावक-यांना 13 किलोमीटर अंतर पार करत ग्रामसेवकाच्या घरी जाऊन काम करून घ्यावे लागत आहे. या नाहक त्रासापोटी नागरिक संतप्त झाले असून जर समस्या सोडवली नाही तर मोठे आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

काही दिवसांआधी याविषयी कुंभारखनी ग्रामपंचायतीच्या काही सदस्यांनी ग्रामसेवक कार्यालयात गैरहजर असण्याबाबत तक्रार दिली होती. त्यावरून गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेवकाला सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशी ग्रामपंचायत कार्यालयात हजर राहण्याचे तर मंगळवार व गुरुवार या दिवशी पंचायत समिती वणी येथे हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र कार्यालय सतत कुलूपबंदच असते.

ग्रामसेवकाचे ‘वर्क फॉर्म होम’ !
गावातील कर्मचारी गावातच राहावा अशी शासनाची गाईडलाईन आहे. मात्र ग्रामसेवक आपल्या घरीच कामासाठी बोलवत असल्याची गावक-यांची तक्रार आहे. घरी जाऊन काम करण्यासाठी 13 किलोमीटरचे अंतर कापावे लागते. अनेकांकडे घरी जाण्यासाठी वाहनेही उपलब्ध नाहीत. शिवाय घरी जाण्यासाठी आधी फोन करून विचारणा करावी लागते. जर घरी उपलब्ध असेल तरच घरी गेल्यावर काम होते.

रहिवाशी दाखल, जन्म व मृत्यू नोंद, विवाह नोंद, शौचालयाचे प्रमाणपत्र काढणे, गावनमुना 8 देणे इत्यादी कामांसाठी गावक-यांना कार्यालयात जावे लागते. मात्र बीडीओंनी आदेश दिल्यावरही त्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात असल्याने रहिवाशी संतप्त झाले आहे. याशिवाय ग्रामपंचायत कार्यालय असताना घरी जाऊन काम का करावे? असा प्रश्नही गावकरी उपस्थित करीत आहे. जर ही समस्या लवकर सोडवली नाही तर मोठे आंदोलन केले जाईल असा इशारा गावक-यांनी दिला आहे.

हे देखील वाचा:

Leave A Reply

Your email address will not be published.