लोकमान्य टिळक महाविद्यालयात सप्तदिनात्मक “लक्षवेध २०१८”
सुरेंद्र इखारे, वणी – “किमान एक हजार दिवस पर्यंत सातत्यपूर्ण रीतीने केलेले परिश्रम आणि तेवढाच काळ अविश्रांत रीतीने केलेली फळाची प्रतीक्षा हीच वैशिष्ट्यपूर्ण यशाचे गमक होय ” असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक मंडळ वणीचे अध्यक्ष आणि उद्योजक नरेंद्र नगरवाला यांनी केले. लोकमान्य टिळक महाविद्यालयात , वाणिज्य विभागाद्वारे आयोजित या चर्चासत्राच्या प्रथम व्याख्यानात व्यावसायिक कौशल्य या विषयावर ते विचार व्यक्त करीत होते.
याप्रसंगी अध्यक्षस्थानी मंडळाचे सहसचिव अशोक सोनटक्के उपस्थित होते. नगरवाला यांनी आपल्या ओघवत्या आणि प्रभावकारी शैलीत खरेदीमध्ये बचत, संभाषणाचे कौशल्य, सादरीकरणातील नम्रता, वेळेचे नियोजन, उत्पादनाची विश्वसनीयता इ. मुद्यांचे सविस्तर आणि सोदाहरण स्पष्टीकरण सादर केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अरुंधती निनावे यांनी केले. सुमारे साडेतीनशे विद्यार्थी लाभान्वित होत असलेल्या या चर्चासत्राचे सूत्रसंचालन मनोज जंत्रे यांनी तर आभार प्रदर्शन वाणिज्य विभाग प्रमुख संगीता दुमोरे यांनी केले.