वणीलगत असलेले लेआउट पालिकेत समाविष्ट होण्याची शक्यता
ग्राम पंचायतीचा विकास निधी जाणार पाण्यात
वणी: शहरालगत असलेल्या ग्राम पंचायतीच्या हद्दीत येणारा बहूतांश भाग शहरात विस्तारित होण्याची शक्यता आहे. यातील काही ग्राम पंचायतीनं वाढीव भागात आमुलाग्र विकास केला आहे. आता संबधीत लेआउट पालिकेत जाणार असल्यानं या क्षेत्राचा विकास खुंटण्याची चिन्हे दिसायला लागली आहे. शहरात आधीच अवदसा असताना नवीन भागाचा पालिका विकास कसा करणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
चिखलगाव, गणेशपूर, लालगुडा, वागदरा, सोबतच वडगाव टिप आदी गावाच्या हद्दीतील लेआउटमधील काही भाग नगर पालिका क्षेत्रात समाविष्ट होण्याची चिन्हं दिसू लागली आहे. याबाबत नुकतंच ग्राम पंचायतींना पत्र सुध्दा प्राप्त झाल्याची माहिती आहे. गेल्या वीस वर्षाहून अधिक काळ ग्राम पंचायत क्षेत्रात वास्तव्यास असलेल्या रहिवाशांना पुढील काळात अडचणीचा सामना करावा लागणार आहे.
चिखलगाव ग्राम पंचायत कार्यक्षेत्रातील विद्यानगरी परिसरात ग्राम पंचायतीनं सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न केले आहे. पाण्यासाठी टाकी बांधून पाणी पुरवठा करण्यासाठी कुपनलिका सुध्दा तयार केल्या आहेत. तर उर्वरित भागात पक्के रस्ते, पाणी सुविधा, वीज आदी बाबींचा विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता सदर भाग पालीकेच्या हद्दीत जात असल्यानं विकास कामांना जणू खिळच बसण्याची चिन्हे दिसायला लागली आहेत.
चिखलगाव ग्राम पंचायतीचे सरपंच सुनिल कातकडे यांनी ग्राम पंचायत हद्दीतील बहुतांश नवीन लेआउट ग्राम पंचायतीला हस्तांतरित करून त्याठिकाणी विकास कामे केली आहे. आता हा भाग पालिकेत जाणार असल्यानं आधीच विकासकामांकडे दुर्लक्ष करणारी पालिका नव्यान समाविष्ट होणा-या भागाचा कसा विकास करणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.
(प्रगती नगर झालं अधोगती नगर, रस्त्यात ठिकठिकाणी खड्डे)
भविष्यात शहरालगत असलेल्या ग्रामपंचायतीचा भाग शहरात समाविष्ट झाला तर तेथील रहिवाशांचे चांगलेच हाल होण्याची शक्यता आहे. शहरातील खड्डेमय रस्ते बघता पालीका नवीन क्षेत्रात विकास कामं करणार काय असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. आता स्थानिक रहिवासी या गंभीर प्रश्नावर उठाव घेणार की पालिका कार्यक्षेत्रात जाणं पसंत करणार हे येत्या काळात कळेल.