सुशील ओझा, झरी: सोमवारी दिनांक १६ मार्च रोजी झरीतील महाराष्ट्र बँकेत लिंक नसल्याने बँकेचे आर्थिक व्यवहार पूर्णपणे ठप्प पडले. त्यामुळे खातेदारांना नाहक त्रास सहन करावा लागला. रविवारच्या शासकीय सुट्टी नंतर दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र बँकेचे खातेदार झरी येथील शाखेत गेले असता लिंक नाही व बँकेतील यूपीएस मध्ये बिगाड झाल्याने आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याची माहिती त्यांना देण्यात आली. तसेच यूपीएस दुरुस्त झाल्यावर व्यवहार सुरू होईल असे कळविण्यात आले होते. पण सायंकाळ पर्यंत लिंक न आल्याने खातेदारांना ताटकाळत बसावे लागले. आर्थिक व्यवहार न झाल्याने शेतकऱ्यांचे अनेक कामे खोळंबली ज्यामुळे शेतकऱ्यांत प्रचंड संताप व्यक्त होत होता.
शासनाने शासकीय सर्व कामे ऑनलाइन केली आहे. परंतु झरी येथे एकही दिवस लिंक बरोबर राहत नसल्याने शासकीय व बँकेचे कामे कधीच व्यवस्थित होत नाही. त्यातच ‘मार्च एन्डिंग’ असल्याने व्यापा-यांपासूनच सर्वसामान्यांनाही व्यवहार क्लिअर करणे गरजेचे आहे. मात्र लिंकच्या समस्येमुळे अनेकदा शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांना, व्यापा-यांना परत जावे लागते.
एटीएम असून नसल्यासारखे
बँकेत एटीएम आहे. मात्र त्यातही पैसे नसल्याने खातेदारांना पैसे काढता आले नाही. एटीएम असूनही अनेकदा एटीएम आउट ऑफ सर्विस असतो तर अनेकदा त्यात पैसे नसते. त्यामुळे नागरिकांना एटीएमचा कोणताही फायदा होताना दिसत नाही.
झरी हे तालुक्याचे ठिकाण असून येथे सर्वच शासकीय कार्यलय आहे. त्यामुळे शेतकरी विदयार्थ्यांसह सामान्य माणुससुद्धा कार्यालयीन कामाकरिता येतो. तालुक्यातील पाटण, झरी, शिबला, जामनी, माथार्जुन, मुच्ची, मार्की, ल. पांढरकवडा, शिरोला, कोडपखिंडी सह अनेक गावातील शेतकऱ्यांचे बँक खाते झरी येथील प्रत्येक बँकेत आहे. परंतु लिंक नसल्याने शेतकऱ्यांचे बँकेतील आर्थिक कामे खोळंबली आहे. या प्रकऱणी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.