धक्कादायक: मोमिनपु-यात चिमुकल्यावर पुन्हा द्रव्य हल्ला

सलग तीन दिवसातील तिसरी घटना, मोमिनपु-यात एकच खळबळ

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील मोमीनपुरा येथे आज पुन्हा एका 5 वर्षीय चिमुकल्यावर ज्वलनशील द्रव्याने हल्ला करण्यात आला. आज दुपारी 4.45 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. गेल्या तीन दिवसात चिमुकल्यावर अशा द्रव्य हल्ल्याची ही तिसरी घटना आहे. विशेष म्हणजे हे तिन्ही चिमुकले एकाच कुटुंबातील आहे. सततच्या हल्यामुळे मोमिनपुराच नाही तर संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. रविवारी झालेल्या हल्ल्यानंतर सदर आम्लद्रव्य हे बॅटरी वॉटर असल्याचे समोर आले होते. 

अशरखान इनायतखान (5) हा चिमुकला मोमिनपुरा येथील मस्जिद जवळ राहतो. तो आज सोमवारी दिनांक 27 डिसेंबर रोजी दुपारी 4.45 वाजताच्या सुमारास घराजवळ खेळत होता. दरम्यान एका मोपेडवर एक व्यक्ती दुचाकीने आली व त्यातील एका व्यक्तीने अशरखानच्या चेह-यावर ज्वलनशील द्रव्याने हल्ला केला. त्यानंतर ते तातडीने तिथून निघून गेले अशी माहिती चिमुकल्याच्या कुटुंबीयांनी दिली. घटनेची माहिती मिळताच लोकांनी तिथे एकच गर्दी केली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांची चमू देखील तात्काळ घटनास्थळी पोहोचली होती.

सलग तिसरा हल्ला
मोमीनपुरा परिसरात शफीउल्ला खान हे आपल्या परिवारासह राहतात. ते रोजमजुरीचे काम करतात. त्यांना एक मुलगा उझेब (8) व मुलगी अश्फानाझ (5) आहेत. शनिवारी त्यांच्या मुलावर व रविवारी त्यांच्या मुलीवर घराजवळ खेळत असताना असाच हल्ला करण्यात आला होता. पहिल्या घटनेच्या वेळी त्यांच्या कुटुंबीयांनी दुर्लक्ष केले मात्र सलग दुसरा हल्ला झाल्याने त्यांनी पोलीस स्टेशन गाठले. तपासणी केली असता सदर द्रव्य हे बॅटरी वॉटर असल्याचे समोर आले. या दोन घटनेनंतर खळबळ माजली असताना आज शफीउल्ला यांच्या लहान भावाच्या मुलावर हल्ला झाला.

या तिन्ही हल्ल्यात कोणतीही जखम झाली नसली तरी चेह-यावर जळजळ होत असल्याची माहिती पीडितांच्या कुटुंबीयांनी दिली. सदर घटनेमुळे संपूर्ण मोमिनपुराच नव्हे तर संपूर्ण वणी दहशतीत आली आहे. असे हल्ले करून दहशत पसरवणा-या नराधमाचा पोलीस कसून शोध घेत आहे. सध्या या प्रकरणी सीसीटीव्हीची तपासणी सुरू आहे. दरम्यान पीडितांच्या कुटुंबीयांनी पोलीस स्टेशन गाठले असून याबाबत तक्रार नोंदवणे सुरू आहे. दरम्यान नागरिकांनी शांतता राखावी असे आवाहन कऱण्यात आले आहे.

हे देखील वाचा:

प्रेमसंबंधातून पैसे घेतले उधार, पैसे मागताच प्रेयसी झाली गद्दार

नांदेपेरा रोड रेल्वे क्रॉसिंगवर वाहतुकीचा खोळंबा

Comments are closed.