मांगलीत आडव्या बाटली साठी सहा जानेवारीला मतदान
दारूबंदीच्या लढ्यात महिलाशक्ती विजयाच्या उंबरठ्यावर
रफीक कनोजे, झरी : तालुक्यातील मांगली गावातील परवाना धारक देशी दुकान बंद करण्याकरिता सर्व महिला एकवटल्या असून १५ ऑगस्टला गावातील संपूर्ण दारू बंद करण्याचा निर्णय घेऊन तसा ठराव सुद्धा घेण्यात आला होता. त्यानंतर गावात विशेष ग्रामसभा घेण्यात आली व सर्व कागदाची पूर्तता करून दिवाळीपुर्वी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात कागदपत्र देण्यात आले. तसेच गावातील दारू दुकान त्वरित बंद करण्याकरता मांगली गावतातील महिला जिल्हाधिकारी कार्यालयावरही धडकल्या होत्या. याच अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी दखल घेत गावातील महिलांच्या सह्या तपासणी केली. राज्य उत्पादन शुल्क विभागाला ग्रामपंचायत कडून सहा जानेवारीला आडवी बाटली, उभी बाटलीच्या मतदानाची मागणी केली आहे व ती मागणी मान्य झाली असू नवीन वर्षात ६ जानेवारी २०१८ मतदान होणार आहे.
या दारू बंद च्या मतदान करीता मांगली गावातील सर्व महिला सह प्रतिष्ठित पुरुष ही एकवटले आहे. गावात दोन गट असून दोन्ही गटातील प्रमुख सुद्धा गावाच्या विकासासाठीएकत्र आल्याने दारू दुकान नक्कीच बंद होणार असे गावकर्याकडून ऐकायला मिळत आहे, तर दुसरीकडे पैशाचा वापर करून आपले देशी दारूचे दुकान वाचवण्याकरिता दारू दुकानदार अधिकार्यापासून तर राजकीय नेत्यापर्यंत धावत असल्याची माहिती आहे. ज्यामुळे या दारू दुकान बंद मतदानात धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ची किमया पाहायला मिळणार आहे.
मांगली येथील देशी दारू दुकानात तालुक्यातील अनेक गावातील तरुण युवकपासून तर वयोवृद्ध इसम दारू पिण्याकरीता जात आहे ज्यात अनेकांचे अपघात झाले, तरुण युवक व्यसनाधीन झाले, अनेकांचे घर उध्वस्त झाले तर शाळेत, महाविद्यालयात जाणाऱ्या तरुण मुलींना मद्यपी लोकांचा पुष्कळ त्रास सहन करावा लागत आहे.
मांगली येथील परवाना देशी दारुचे दुकान हे गावाच्या मध्यभागी असुन १५० फुटावर मोहरम सवारीचा बंगला, शाळा, आरोग्य उपकेंद्र, पाणीपुरवठा करणारी नळ योजना आहे. ह्या दारुदुकानातुन अवैधरीत्या देशीदारु ची विक्री आणि जादा भावाने विक्री होत असा आरोप आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या सर्व त्रासाला कंटाळून संपूर्ण गाव एक होऊन देशी दारू दुकान बंद करण्याचा निंर्णय घेतला आहे व दारू दुकान बंद केल्याशिवाय गप्प बसणार नाही असे ग्रामवासियांचे म्हणने आहे. आता ६ जानेवारीच्या मतदानानंतरच खरे वास्तव्य समोर येईल. ह्या मतदानाकडे संपूर्ण झरी तालुक्यातील नागरीकांचे लक्ष लागुन आहे.