राजूर बायपासजवळ दुचाकीची उभ्या ट्रकला भीषण धडक, दोघे ठार

विवेक तोटेवार, वणी: वणीवरून आपले काम आटोपून राजूर येथे जात दुचाकीची उभ्या ट्रकला धडक बसली. यात चालक तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर मागे बसलेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मंगळवारी रात्री 9.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. श्रीकांत दोब्बलवार (23) रा. राजूर व अमोल कोमलवार (22) रा. जैताई नगर वणी असे मृतकाचे नाव आहे.

श्रीकांत आणि अमोल हे दोघे मामेभाऊ होते. ते दोघेही एकाच खासगी ठिकाणी कामाला होते. मंगळवारी दिनांक 2 मे रोजी दोघेही आपली दुचाकी (MH34 DX 7075) ने चंद्रपूर येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटपून हे दोघेही सुखरूप वणी येथील अमोलच्या घरी परतले. तिथे अमोलने कपडे घेतले व दोघेही रात्री 9.15 च्या दरम्यान राजूर येथे श्रीकांतच्या घरी जाण्यासाठी निघाले.

रात्री 9.30 वाजताच्या दरम्यान राजूर फाट्याच्या अगदी काही अंतर आधी राजूर बायपासजवळून जात असताना तिथे उभ्या असलेल्या एका ट्रकला श्रीकांतच्या दुचाकीची धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की यात श्रीकांतचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच लोकांनी दोघांनाही वणीतील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी श्रीकांतला मृत घोषीत केले. तर गंभीर जखमी असलेल्या अमोलला उपचारासाठी चंद्रपूर येथे हलवण्यात आले.

अमोलवर चंद्रपूर येथे उपचार सुरू होता. मात्र आज पहाटे अमोलची प्राणज्योत मालवली. अमोल आणि श्रीकांत हे दोघेही मामे भाऊ होते. ते दोघे एकाच ठिकाणी काम करायचे. अमोल हा वणीत राहत असला तरी अधिकाधिक वेळ राजूर येथेच मुक्कामाला राहायचा. दोन्ही तरुणाच्या मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे.

उभे ट्रक झाले यमदूत
गेल्या काही दिवसात उभ्या ट्रकमुळे परिसरात अनेक अपघात झाले आहे. यात अनेकांचा जीव देखील गेला आहे. तर अनेक चालक जखमी देखील झाले आहेत. राजूर रोडवर अशा अपघाताचे प्रमाण अधिक आहे. या मार्गावर धरमकाटा असल्याने उभ्या ट्रकची मोठी रांग या ठिकाणी दिसून येते. शिवाय अनेक बंद असवस्थेत असलेले ट्रक देखील रस्त्यावर अनेक दिवस उभे राहताना दिसून येते. याविरोधात अनेकांनी आवाज उठवला होता. मात्र प्रशासनाने याकडे कायम दुर्लक्ष केल्याचे आढळून येते. हेच उभे ट्रक आता यमदूत ठरताना दिसत आहे.

हे देखील वाचा:

लोन देण्याची बतावणी करून वणीतील बिल्डरची 23 लाखाने फसवणूक

Comments are closed.