ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील हिवरी येथील गावक-यांनी भारनियमन बंद करावे व तांत्रिक बिघाड असलेली डीपी दुरुस्ती करावी या मागणीसाठी बुधवारी मारेगावातील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात निवेदन दिले.
हिवरी येथील नागरिक सध्या अनियमित भारनियमनाने त्रस्त आहेत. सध्या सिंचनाचा प्रश्न गंभीर आहे. गावात रात्रीच्या वेळी भारनियमन होते. त्यामुळे साप, विंचू यांचा धोका असतो. सध्या रब्बी हंगाम सुरू होत असल्याने गहू, चना याची लागवड करण्यासाठी विजेची गरज सिंचनासाठी आहे. पण गावात भारनियमन असल्याने हिवरा वासियांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
याबाबत हिवरावासियांनी भारनियमन बंद करावे ही मागणी उप अभियंत्याला निवेदन देऊन केली आहे. जर मागणीकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन केलं जाईल आणि होणा-या परिणामास वीज वितरण कंपनी जबाबदार असेल असा इशाराही त्यांनी दिलाय. यावेळी हिवरी येथील नंदकुमार बोबडे, युवराज घोसले, योगेश्वर गौरकर, मारोती डवरे, सुर्यभान पवार, आकाश बदकी, नवीन बामणे, गजानन गौरकर आदी उपस्थित होते.