कृतज्ञता लोकभवनाचे थाटात लोकार्पण
जयप्रकाश वनकर, बोटोणी: बोटोणी येथून पश्चिमेस चार किलोमीटर अंतरावर असलेले खैरगाव येथे नीड संस्थेच्या वास्तूचा उद्घाटन सोहळा पार पडला. उद्घाटन प्रसंगी शिवनाळा येथील गाव प्रमुख नामदेवराव आत्राम कार्यक्रमाचे अध्यक्ष होते, तर उदघाटक विलासराव देशमुख, डॉ. वृंदा देशमुख यवतमाळ, मन्सूर खोराशी आर्ट संस्था पांढरकवडा व संस्थेचे उपाध्यक्ष गुणवंत काळे उपस्थित होते. हे लोकभवन मारेगाव तालुक्यातील नीड परीवाराच्या हितचिंतकाच्या आर्थिक मदतीतून व लोकसहकार्यातून उभे झाले आहे.
नीड संस्था २०१० पासून मारेगाव तालुक्यातील २० गावात कोलम वस्ती असलेल्या गावामध्ये गुणवत्ता पूर्ण शिक्षण या विषयावर काम करते. 2 री ते 8 वीच्या मुलांना भाषा व गणित विषयातील मुलभूत क्षमता प्राप्त होण्यासाठी गावातील तरुणाच्या मदतीने शिक्षणात बदल घडून आणण्याचे काम या संस्थेद्वारे केले जाते.
संस्थेचे सचिव सुनील गोवारदीपे हे पूर्ण वेळ काम बघतात. संस्थेच्या या कार्याला पाहून मारेगाव, नागपूर, पुणे येथील समाजातील संवेदनशील लोकांनी संस्थेला कृतज्ञता लोकभवन हि वास्तू बांधून दिली. या वास्तू निर्मिती साठी लोकसहभाग तर होताच सोबतच नीड संस्थेचे सचिव सुनील गोवारदीपे यांनी देखील परिश्रम घेतले. या वास्तू निर्मितीची कल्पना महेबुब शेख यांची होती. उद्घाटन प्रसंगी त्यांचे देखील आभार मानण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन गंगाधर आत्राम यांनी केले तर प्रास्ताविक संस्थेचे सचिव सुनील गोवारदीपे यांनी केले. या वेळी कार्यक्रमात लाभलेल्या प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व नीड संस्थेच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.