लढा फळाला; लोकमान्य टिळकांचा पुतळा होणार पूर्ववत
जयंत त्रिवेदी यांच्या लढ्याला यश, पालिकेत ठराव मंजूर
बहुगुणी डेस्क, वणी: वणी शहराच्या ऐतिहासिक अस्मितेशी जोडलेला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुतळ्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत लोकमान्य टिळक यांचा पुतळा पूर्वीच्या मूळ जागेवर पुनर्स्थापित करण्याचा ठराव आज सोमवारी दिनांक 13 जुलै रोजी मंजूर करण्यात आला. या निर्णयामुळे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या मागणीला न्याय मिळाला असून, या विषयावर सातत्याने पाठपुरावा करणारे जयंत त्रिवेदी यांच्या लढ्याला अखेर यश मिळाल्याची भावना शहरात व्यक्त होत आहे.
लोकमान्य टिळकांचा पुतळा : थोडक्यात इतिहास
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी फेब्रुवारी 1918 मध्ये वणीचा दौरा करून स्थानिक जनतेमध्ये स्वराज्याची प्रेरणा जागवली. त्यांच्या दौऱ्यानंतर वणी हे विदर्भातील स्वातंत्र्य चळवळीचे एक महत्त्वाचे केंद्र म्हणून ओळखले जाऊ लागले. टिळकांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी वणीत टिळक स्मारक समिती सक्रिय होती. लोकमान्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 1956 मध्ये त्यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. स्वर्गीय बाबासाहेब देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील पुतळा समितीने सुमारे 4 हजार रुपयांचा निधी उभारून टिळकांचा पुतळा उभारला. 19 डिसेंबर 1956 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते, लोकनायक बापूजी अणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुतळ्याचे अनावरण झाले. तेव्हापासून टिळक चौक आणि लोकमान्यांचा पुतळा वणीच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक इतिहासाचे महत्त्वपूर्ण प्रतीक बनले.
का हटविण्यात आला पुतळा?
सन 2003 मध्ये रस्ता रुंदीकरणाच्या कामादरम्यान वाहतुकीला अडथळा होत असल्याचे कारण देत प्रशासनाने टिळक चौकातील पुतळा मूळ जागेवरून हटविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पुतळा चबुतऱ्यावरून सुरक्षितरीत्या हलवण्यात आला. काही काळ तर पुतळा पोलीस ठाण्याच्या ताब्यात होता. पुतळ्याचा मजबूत चबुतरा पाडण्यासाठी जवळपास महिनाभराचा कालावधी लागला. त्यानंतर पुतळा पोस्ट ऑफिसलगतच्या जागेवर पुन्हा स्थापित करण्यात आला. पुढे 2015-16 मध्ये वाहतूक व्यवस्थापनाच्या उद्देशाने मूळ जागेवर ‘सुरक्षा सर्कल’ उभारण्यात आले. मात्र, या संरचनेमुळे अपेक्षित वाहतूक सुधारणा न होता वाहतुकीस अडथळे निर्माण होऊ लागले. त्यामुळे लोकमान्य टिळकांचा पुतळा पूर्वीच्या ऐतिहासिक जागेवरच पुन्हा स्थापित करण्याची मागणी जोर धरत गेली.
जयंत त्रिवेदी यांचा लढा
लोकमान्य टिळक महाविद्यालयात प्रयोगशाळा परिचारक म्हणून कार्यरत असलेले जयंत त्रिवेदी यांनी लोकमान्य टिळकांचा पुतळा पूर्ववत मूळ जागेवर बसविण्याचा मुद्दा सातत्याने लावून धरला. निवेदनांच्या माध्यमातून त्यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. गेल्या वर्षी तर लोकमान्य टिळकांची वेशभूषा परिधान करून त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. तसेच पुतळा मूळ जागी पुनर्स्थापित करण्याची आग्रही मागणी केली. मात्र, त्यानंतरही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने त्यांनी प्रशासनाला 26 जुलैपर्यंतचा अल्टिमेटम दिला. या मुदतीत निर्णय न झाल्यास आमरण उपोषण छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला होता.
पालिकेच्या ठरावात नमूद करण्यात आले आहे की, “टिळक चौक” ही वणी शहराची अनेक दशकांची ऐतिहासिक ओळख असून ती कायम राखणे आवश्यक आहे. पुतळा पूर्वीच्या जागी बसविल्यास वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, उलट वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होईल. त्यामुळे आवश्यक त्या सक्षम प्राधिकरणांची मान्यता घेऊन मुख्याधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करून लोकमान्यांचा पुतळा पूर्ववत मूळ जागेवर स्थापित करावा आणि वणीकरांच्या भावनांचा सन्मान करावा, अशी शिफारसही सभागृहाने केली आहे.
नगरपालिकेने हा ठराव मंजूर केल्याने अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न निकाली निघण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. या निर्णयाचे शहरभर स्वागत होत असून, इतिहास, जनभावना आणि वाहतूक व्यवस्थापन या तिन्ही बाबींचा विचार करून योग्य निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया वणीकरांकडून व्यक्त केली जात आहे.


Comments are closed.