बांधकामाचे साहित्य ठेवण्यावरून वाद; विटा फेकून हल्ला

दोन शेजारी कुटुंबात हाणामारी, तिघे जखमी, तिघांवर गुन्हा दाखल

बहुगुणी डेस्क, वणी: घरासमोरील बांधकाम साहित्यावरून सुरू झालेला शेजारी वाद अखेर हाणामारीपर्यंत पोहोचला. विटा व लोखंडी सळाख्या ठेवण्याच्या कारणावरून दोन कुटुंबांमध्ये जोरदार वाद झाला. या मारहाणीत महिलेसह दोघेजण जखमी झालेत. तालुक्यातील पळसोनी येथे रविवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. मारहाण, शिवीगाळ व जीवे मारण्याच्या धमकीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी वर्षा राजेंद्र वाडके (42, रा. पळसोनी, ता. वणी) या शेती व्यवसाय करतात. रविवारी (दि. 12 जुलै) सायंकाळी सुमारे 6 वाजताच्या सुमारास त्या घरी होत्या. दरम्यान रेखा रामाजी नवले (45, रा. पळसोनी, ता. वणी) या त्यांच्या घरासमोर आल्या. घराच्या बांधकामासाठी आणलेल्या विटा व लोखंडी सळाख्या त्यांच्या जागेत का ठेवल्या, यावरून त्यांनी वाद घालण्यास सुरुवात केली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

दरम्यान, वाद सोडविण्यासाठी फिर्यादीचे पती राजेंद्र महादेव वाडके (57) व दिर पूनचंद महादेव वाडके (52) हे पुढे आले. त्यावेळी आशिष रामाजी नवले (32, रा. पळसोनी, ता. वणी) याने हातातील विट पूनचंद वाडके यांच्या दिशेने फेकून मारली. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला व कानाला दुखापत झाली. यानंतर वाद आणखी चिघळला. फिर्यादीचे पती राजेंद्र वाडके यांना ढकलून खाली पाडण्यात आल्याने त्यांच्या हाताला दुखापत झाली. फिर्यादी वर्षा वाडके या मध्यस्थी करण्यासाठी पुढे गेल्या असता रेखा नवले यांनी त्यांच्या मानेवर विट मारून जखमी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

त्यानंतर रामाजी नवले (50, रा. पळसोनी, ता. वणी) हे घटनास्थळी आले. त्यांनी फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. फिर्यादी वर्षा यांनी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. या प्रकरणी रेखा रामाजी नवले, आशिष रामाजी नवले आणि रामाजी नवले यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 118(1), 352, 351(2), 351(3) व 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत.

Comments are closed.