वणीत मध्यरात्री धाडसी दरोडा, टोळी शिरली घरात

शस्त्रांचा धाक दाखवून हल्ला, लाखोंचा ऐवज व कॅश लुटली

विवेक तोटेवार, वणी: वणी नगरपालिका निवडणुकीच्या धामधुमीत एकीकडे उत्साहाची लाट उसळत असताना, दुसरीकडे शहराला दरोड्याच्या भयानक घटनेने हादरवले आहे. गाडगेबाबा चौक परिसरातील एका वृद्धाच्या घरी मध्यरात्री शस्त्रधारी दरोडेखोरांनी हल्ला करून लाखोंचा ऐवज लुटला. ही घटना रविवारच्या पहाटे दिड ते दोन वाजताच्या सुमारास घडली. यामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

प्राप्त माहितीनुसार, संजय निळकंठराव कोंडावार (70) हे गाडगेबाबा परिसरातील रहिवासी आहेत. त्यांच्या पत्नीचे निधन झाल्याने ते घरी एकटेच राहतात. त्यांचा व्यवसाय होता. सध्या ते शेती पाहायचे. एक सधन व्यक्ती म्हणून त्यांची त्यांची परिसरात ओळख आहे. त्यांनी घरी एक चौकीदार देखील ठेवला आहे. शनिवारी रात्री ते नेहमीप्रमाणे घरी झोपले होते. तर चौकीदार घरासमोर होता. पहाटे 1.30  वाजताच्या सुमारास काही शस्त्रधारी दरोडेखोर तोंडाला स्कार्फ बांधून  घरासमोर आले.

आधी चौकीदार बंदी
दरोडेखोरांच्या टोळीने अंगणात प्रवेश केला. चौकीदाराच्या गळ्यावर सुरी ठेवत धाक दाखवला. तसेच घरमालकाला आवाज देण्यास सांगितले. चौकीदाराने मालकाला आवाज दिला. काय झाले म्हणून संजय हे उठले असता त्यांना समोर दरोडेखोरांची टोळी दिसली. यातील एकाने संजय यांच्या हातावर चाकूने हल्ला करत त्यांना बंदी केले. तर इतरांनी चौकीदाराला बंदी केले. त्यांच्या तोंडात कपडा कोंबला. दरोडेखोरांनी संजय यांच्या गळ्यातील सोन्याची चैन काढली. तसेच घरातील अलमारी फोडून लाखोंचा सोन्याचा ऐवज व रोख रक्कम लुटली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

लुटमार केल्यानंतर दरोडेखोर तात्काळ पळून गेले. चार ते सहा जणांची ही टोळी असल्याची प्राथमिक माहिती आहे. काही वेळाने बांधलेल्या अवस्थेतून घरमालक व चौकीदाराने सुटका केली. वणी पोलिसांना कॉल केला. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदार व फिंगरप्रिंट्स गोळा करण्यात आले आहेत. दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नेमले असल्याची माहिती आहे.

अद्याप किती लाखांचा ऐवज लंपास केला हे कळू शकले नसले तरी सुमारे 20 ते 30 लाखांचा ऐवज लंपास केल्याची चर्चा आहे. तसेच त्यांच्या गळ्यात असलेली सोन्याची चैन हीच वजनदार होती.  सकाळी ही घटना उघडकीस येताच शहरात एकच खळबळ उडाली. गेल्या वर्षी लालगुडा येथे दरोड्याची घटना घडली होती. तर प्रगतीनगर येथील दरोड्याचा प्रयत्न फसला होता. त्यानंतर काही काळानंतर ही घटना उघडकीस आली आहे.

Comments are closed.