संपूर्ण निवडणूक की केवळ प्रभाग 14 क ची निवडणूक लांबणीवर?
प्रशासनाची निवडणुकीच्या दिशेने तयारी सुरू, संध्याकाळपर्यंत निर्णय येण्याची शक्यता
बहुगुणी डेस्क, वणी: सदर बातमी अपडेट करण्यात आली असून सदर लिंकवर क्लिक करून सविस्तर बातमी वाचा…
निवडणुकांच्या प्रचारतोफा अंतिम टप्प्यात आल्या असताच राज्यातील काही नगरपालिकांतील विविध प्रभागांच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. तर यवतमाळ जिल्ह्यातील तीन नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय बाकी होता. त्यामुळे शहरात विविध चर्चेला उधाण आले. या पार्श्वभूमीवर ‘वणी बहुगुणी’ने निवडणूक कार्यालयाला भेट दिली असता तिथे मतदानाच्या दिशेने कामकाज सुरु असलेले निर्दशनास आले. मात्र अद्याप अंतिम निर्णय होणे बाकी असून रविवारी संध्याकाळ पर्यंत हा निर्णय येण्याची शक्यता आहे. राज्यातील इतर नगरपालिकेबाबतचा निर्णय बघता संपूर्ण निवडणूक लांबणीवर जाण्याऐवजी वणीतील प्रभाग 14 (क) ची निवडणूक लांबणीवर पडण्याची दाट शक्यता आहे.
14 क ची निवडणूक लांबणीवर?
दिनांक 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या अनुशंगाने पूर्वतयारीचे कामकाज निवडणूक कार्यालयात नियमित प्रमाणे सुरू असल्याचे दिसून आले. जसे साहित्य वाटप, मतदान पथकाचा वाहतूक आराखडा, मतमोजणी प्रशिक्षण इत्यादी बाबी नियमित प्रमाणे सुरू आहे. आयोगाच्या पत्राचा अन्वयार्थ लक्षात घेता, केवळ वार्ड क्रमांक 14 मधील (क) या जागेची निवडणूक पुढे ढकलण्यात येण्याची दाट शक्यता आहे. तर याच प्रभागातील अ व ब या ठिकाणी तसेच इतर तेरा ठिकाणी निवडणूक होण्याची चिन्ह आहे.

आज सकाळी प्रचाराच्या तोफ थंडावल्या व त्याची जागा नगरपालिका निवडणूक पुढे ढकलल्या जाण्याच्या चर्चेने घेतली. ऑटो थांबले, भोंगे थांबले. नेत्यांचे सकाळचे कार्यक्रम थांबले. मात्र दुपार नंतर प्रचार सुरु झाला. निवडणुकीबाबत आज संध्याकाळपर्यंत निर्णय येणे अपेक्षीत आहे. दरम्यान निवडणूक कार्यालयाकडून अधिकृत सूचना प्राप्त झाल्याशिवाय अन्य कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.



Comments are closed.