विवेक तोटेवार, वणी: सध्या कोरोनाची महामारी सुरू असल्याने डॉक्टरांतर्फे सर्वसामान्य रुग्णांना सीबीसी तसेच इतर टेस्ट करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र या महामारीचा फायदा घेऊन शहरातील काही खासगी लॅब रुग्णांकडून दुप्पट ते तिप्पट दर वसूल करीत आहे. संकटकाळी होणा-या अशा लूटमुळे गोरगरीब रुग्णांचे आर्थिक शोषण होत आहे. दरम्यान शिवसेना प्रणीत युवासेनेचे जिल्हा प्रमुख विक्रांत चचडा यांनी कोरोनाच्या काळात वारेमाप दर न आकारता सहकार्य करावे असे आवाहन खासगी लॅबला केले आहे.
डॉक्टर कमजोरी, थकवा, ताप, इत्यादींच्या लक्षणाचे कारण जाणून घेण्यासाठी सीबीसी टेस्टचा उपयोग केला जातो. सध्या डॉक्टर सर्वसामान्य रुग्ण कोरोनामुळे आजारी आहे की इतर गोष्टींमुळे यासाठी सीबीसी टेस्ट व इतर टेस्ट करण्याचा सल्ला देतात. सीबीसी टेस्टसाठी इतर वेळी खासगी लॅबमध्ये 200 ते 300 रुपये आकारले जातात. या टेस्टमध्ये रुग्णांच्या रक्तात असलेले पांढ-या रक्त पेशी, लाल रक्त पेशी, हिमोग्लोबिन, प्लेटलेट इत्यादींची संख्या तपासली जाते.
आता या टेस्टचा दर अचानक 500 ते 600 रुपये करण्यात आला आहे. याशिवाय इतर टेस्टचा दर देखील वाढवण्यात आला आहे. याबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त करत या बाबत सोशल मीडियावरून आवाज उठवला आहे. मात्र अद्यापही खासगी लॅबकडून रुग्णांची लूट सुरू आहे. याबाबत युवासेनेचे जिल्हा प्रमुख विक्रांत चचडा यांनी खासगी लॅबला अतिरिक्त शुल्क आकारू नये असे आवाहन केले आहे.
कोरोना काळात खासगी लॅबने गोरगरिबांना साथ द्यावी: विक्रांत चचडा
लॅब टेक्निशियन सध्या पहिल्या फळीतील कोरोना योद्धा म्हणून काम करीत आहे. कोरोनासारख्या काळात ते दिवसरात्र मेहनत करून आपली सेवा देत आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत आदर आहे. मात्र काही खासगी लॅब चालक या महामारीचा फायदा घेत आहे. याबाबत अनेकांच्या तक्रारी येत आहे. महामारीत सर्वांचीच परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे जवळपास दुप्पट ते तिप्पट दर आकारणे मानवतेच्या दृष्टीने योग्य नाही. गोरगरीब जनता आधीच काम नसल्याने भरडली आहे. त्यामुळे लॅब चालकांनी रुग्णांची लूट करू नये अशी त्यांना मी नम्र विनंती करीत आहे.
:विक्रांत चचडा, जिल्हा प्रमुख युवासेना
एकीकडे रेमडेसिविर व इतर इंजेक्शनचा काळाबाजार बघून प्रशासनाने त्यावर आळा घालण्यासाठी त्यावर संबंधीत विभागाचे नियंत्रण आणले आहे. मात्र खासगी लॅबकडून होणा-या लुटीबाबत मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. कोरोना काळात लागलेल्या लॉकडाऊनमुळे आधीच अनेकांचे रोजगार गेले आहे. त्यातच खासगी लॅबकडून होणारी लूट थांबवली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हे देखील वाचा: