ऍम्बुलन्स चालकांकडून रुग्णांची लूट, दुप्पट ते तिप्पट वसुुली

होम आयसोलेट सर्टिफिकेट देणे हा झाला काही डॉक्टरांचा धंदा

0

जितेंद्र कोठारी, वणी: सध्या तालुक्यातील कोरोनाची रुग्णसंख्या ही पिकवर आहे. रुग्णांसाठी बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, इंजेक्शन व ऍम्ब्युलंस यासाठीच रुग्णांच्या नातेवाईकाची धावपळ सुरू आहे. मात्र याचा फायदा घेऊन शहरात सध्या काही ऍम्बुलन्स चालकांनी रुग्णांची अक्षरश: लूट सुरू केल्याचा आरोप होतोय. ज्याचे भाडे नियमानुसार 3 ते 4 हजार होतात त्यासाठी तब्बल 15 ते 20 हजार रुपयांचे भाडे रुग्णांच्या नातेवाईकांकडून आकारले जात असल्याची खात्रीलायक माहिती आहे. नागपूर सारख्या शहरातही सध्या 20 हजार रुपये दर आकारला जात आहे. या महामारीत ही लूटच कमी नव्हती तर आता काही डॉक्टरांनीही लूट करण्यास सुरुवात केली आहे. सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने होम आयसोलेट रुग्णांची संख्या वाढली आहे. मात्र होम आयसोलेट होण्यासाठीच्या सर्टिफिकेटसाठीही रुग्णांकडून पैसे वसुल केल्या जात असल्याची तक्रार अनेक लोक करीत आहे. ओपीडीची फीस 200 रुपये असताना त्यांच्याकडून केवळ होम आयसोलेटच्या सर्टिफिकेटसाठी 300 रुपये अधिकटचे मागितले जात असल्याचा आरोप काही रुग्णांनी केला आहे. 

कोरोनाच्या काळात रुग्णांना उपचारासाठी रुग्णवाहिकांची सर्वाधिक गरज आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची ने-आण करण्यासाठी रुग्णवाहिकांची मागणी वाढली आहे. रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक असल्याने ऑक्सिजन व आयसीयू असलेल्या रुग्णवाहिकाही कमी पडू लागल्या आहेत. अनेक रुग्णांची स्थिती चिंताजनक असल्याने रुग्णांना चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, आदिलाबाद येथील रुग्णालयात दाखल केले जात आहे. या परिस्थितीचा अनेक रुग्णवाहिका चालक गैरफायदा घेत नातेवाइकांकडून जादा दर आकारणी करीत असल्याचे प्रकार समोर आले आहे. याबाबत अनेकांनी ‘वणी बहुगुणी’ आपबिती बोलून दाखवली. यात तब्बल दुप्पट ते तिप्पट रक्कम रुग्णांच्या नातेवाईकांकडून वसुल करण्यात येत असल्याचा आरोप आहे. सध्या अदिलाबादसाठी 15 ते 20 हजार रुपये, नागपूर येथे 20 हजार रुपये तर यवतमाळ साठी 15 हजार रुपयांपर्यंत आकारले जात आहे.

रुग्णाचा मित्र रडला तरी 15 हजारांची वसुली
गेल्या आठवड्यात एका गंभीर रुग्णाला पुढील उपचारासाठी ऍम्बुलन्समध्ये अदिलाबाद येथे हलवण्यात आले. रुग्णासोबत त्याचा मित्र होता. मात्र तिथे गेल्यावर त्याच्याकडून 15 हजार रुपयांची मागणी करण्यात आली. रुग्णांची आर्थिक परिस्थिती ठिक नसल्याने त्यांने चालकाकडे गयावया करून पैसे कमी करण्याची मागणी केली. 15 हजार दिल्यास उपचारासाठी पैसे उरणार नाही त्यामुळे पैसे कमी करावे असे आर्जवही रुग्णाच्या मित्राने केले. अखेर तो रडला. मात्र त्यानंतरही त्याला 15 हजार रुपये द्यावे लागले. याशिवाय गेल्या आठवड्यात छोरिया अपार्टमेंट येथील एका रुग्णाला 18 हजारांची मागणी करण्यात आल्याची माहिती आहे.

नियमानुसार रुग्णवाहिका (चारचाकी) इंधनविरहीत 300 किमी पर्यंत (24 तासकरिता) रु.1400 व 8 तास /80 किमी साठी ( इंधन, चालक व मदतनीससह) रु. 1900 तर 100 किमी साठी ( इंधन, चालक व मदतनीससह) रु. 2200 ठरविले आहे . ऍम्ब्युलन्स (सर्व सुविधायुक्त) इंधनविरहीत 300 किमी पर्यंत (24 तासकरिता) रु.2500 व 8 तास /80 किमी साठी ( इंधन, चालक व मदतनीससह) रु. 3300 तर 100 किमी साठी ( इंधन, चालक व मदतनीससह) रु. 3500 आकारण्याचे नियम शासनाने ठरविले आहे.

वणी येथे ग्रामीण रुग्णालयातील 108 क्रमांकाची रुग्णवाहिकेसह इतर 12 ते 13 खाजगी ऍम्ब्युलन्स सेवेत आहे. डॉक्टरप्रमाणे ऍम्ब्युलन्स चालकनासुद्दा शासनाने फ्रँटलाइन वर्कर्सचा दर्जा दिलेले आहे. मात्र काही ऍम्ब्युलन्स संचालकांनी कोरोना काळात या सेवेला व्यावसायिक स्वरुप देऊन रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा भाडे वसूल करीत असल्याची ओरड होत आहे. रुग्णवाहिका ही सेवा म्हणून कार्य करणारे काही निस्वार्थी लोकही वणीत आहे ज्यांनी स्वतःच्या पैशातून वाहनात पेट्रोल, डीझल टाकून गरीब रुग्णांना वेळेवर दवाखान्यात पोहचविले आहे.

होम आयसोलेट सर्टिफिकेट देणे हा झाला काही डॉक्टरांचा धंदा
कोरोना काळात मोठ्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांची लूट होत असल्याचे आता नेहमीचे झाले आहे. मात्र वणी सारख्या छोट्या शहरात काही डॉक्टर देखील सौम्य लक्षण असलेल्या रुग्णांना होम आयसोलेशन शिफारस करण्यासाठी फी व्यतिरिक्त 300 ते 500 रुपये घेत असल्याचीही तक्रारी काही रुग्णांनी केली आहे. यात शहरातील काही प्रतिष्ठीत डॉक्टरांचा समावेश आहे. अनेक सौम्य लक्षण असलेले रुग्ण सध्या शासकीय कोविड केअर सेंटरमध्ये भरती होण्याऐवजी होम आयसोलेट होण्याचा पर्याय निवडतात. मात्र तिथेही लूट काही थांबलेली नाही. होम आयसोलेट होण्यासाठी रुग्णाला डॉक्टरांच्या अंडर ऑब्झर्वेशन उपचार घेत असल्याचे तसेच सौम्य लक्षणं असल्याने होम आयसोलेट होण्यासाठी हरकत नसल्याचे सर्टिफिकेट द्यावे लागते. मात्र या सर्टिफिकेटसाठी ओपीडीच्या फिस व्यतिरिक्त तब्बल 300 रुपये अधिक घेतल्याचे समोर आले आहे. ओपीडीची फिस 200 तर सर्टिफिकेटचे 300 रुपये असे 500 रुपये रुग्णांकडून घेतले जात आहे.

जैन संघटनांची ऍम्ब्युलन्स गेली कुठे ?
काही वर्षांपूर्वी चंद्रपूर लोकसभाचे खासदार नरेश पुगलिया यांनी जैन श्रावक संघ वणी याना एक मारोती व्हॅन ऍम्ब्युलन्स सप्रेम भेट म्हणून दिली होती. श्रावक संघ पदाधिकाऱ्यांनी ती ऍम्ब्युलन्स येथील एका खाजगी मल्टीस्पेशलिटी दवाखान्याला नो प्रॉफिट नो लॉस तत्वावर चालविण्यासाठी दिली. मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल संचालकांने ती ऍम्ब्युलन्स वणी येथील एका व्यक्तीला चालविण्यासाठी दिली. सदर व्यक्तीने त्या ऍम्ब्युलन्सची डेंटिंग पेंटिंग करून नरेश पुगलिया आणि श्रावक संघाचे नाव मिटविले. आता ती ऍम्ब्युलन्स त्या व्यक्तीची खासगी मिळकतीत झाली आहे. याबाबत जैन संघ पदाधिकारी एकमेकांकडे बोट दाखवित आहे.

हे देखील वाचा:

दिलासा: आज 138 रुग्णांची कोरोनावर मात, तर 34 पॉझिटिव्ह

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.