बहुगुणी डेस्क, वणी: वणी येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयाने साकारलेल्या “ग्रंथ मनीचे गूज” या आगळ्यावेगळ्या उपक्रमाला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात द्वारे नाविण्यपूर्ण उपक्रमाचा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.
इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या प्रचंड प्रभावात असलेली युवा पिढी वाचनाच्या आनंदापासून दुरावत आहे या समस्येवर केवळ चर्चा न करता प्रत्यक्ष कृतीतून एखादा उपक्रम साकारावा आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचनाचे आणि लेखनाचेही कौशल्य विकसित करावे या भूमिकेतून हा उपक्रम राबवण्यात आला होता.
या उपक्रमात प्रत्येक आठवड्यात एका विद्यार्थ्याने एका पुस्तकाचे वाचन करून त्याचा सगळ्यांना परिचय करून देणे असे या उपक्रमाचे मूलभूत स्वरूप आहे. तयार केलेल्या लेखांचे केवळ हस्तलिखित करण्यापेक्षा ते लेख एखाद्या साप्ताहिकात छापून आणावेत हा उद्देश देखील या उपक्रमाचा आहे. तसेच यवतमाळ येथून गत 65 वर्षापासून प्रकाशित होत असणाऱ्या स्वदेश साप्ताहिकात हे सर्व लेख १ जानेवारी २०२० ते ३० डिसेंबर २०२० या काळात प्रत्येक बुधवारी प्रकाशित झाले आहेत.
लॉकडाऊन च्या या विपरीत काळात विद्यार्थ्यांनी लेख तयार करून व्हाट्सअप च्या माध्यमातून पाठवत हा उपक्रम अखंड ठेवला हे विशेष. लवकरच या सर्व लेखांचे संकलन महाविद्यालयाच्या वतीने पुस्तकरूपात देखील प्रकाशित होत आहे. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे २०२१ मध्ये हा उपक्रम आणखी वैशिष्टपूर्ण स्वरूप घेऊन केवळ चरित्र ग्रंथांवरील लेख अशा स्वरूपात अखंड सुरू आहे. यानिमित्ताने लोकमान्य टिळक महाविद्यालयाची नाविन्यपूर्ण उपक्रमाची हॅट्रिक होत आहे. यापूर्वी बिऱ्हाड या साहित्यकृतीचे नाट्यरूपांतर आणि चक्री वाचनालय या दोन उपक्रमांना हा पुरस्कार प्राप्त झाला होता.
१ मे रोजी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या महाराष्ट्र दिनाच्या आभासी कार्यक्रमात रुपये ५००० रोख चा हा विशेष सन्मान महाविद्यालयास प्रदान करण्यात येईल. या उपक्रमाची मूळ कल्पना मांडणारे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे, उपक्रमाचे संयोजक विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड, स्वदेश साप्ताहिकाचे संपादक प्रा.डाॅ. राहुल एकबोटे उपक्रमात सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रसारक मंडळ वणी चे अध्यक्ष नरेंद्र नगरवाला यांनी सर्व संचालकांच्या वतीने विशेष कौतुक केलेले आहे.
हे देखील वाचा: