बहुगुणी डेस्क, वणी: वडगाव रोडवर मॅकरून ही शाळा आहे. या शाळेची एक शाखा दीड वर्षांपूर्वी गंगशेट्टीवार मंगल कार्यालय येथे उघडण्यात आली. मात्र ही शाळा शासनाचे नियम आणि अटी धाब्यावर बसवून सुरु करण्यात आल्याचा आरोप शाळा प्रशासनावर केला जात आहे. विशेष म्हणजे शाळेच्या समोरच बियर शॉपी आहे. तसेच या शाळेसाठी नगर पालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र नसल्याचाही आरोप आहे. त्यामुळे संपूर्ण वर्ष ही शाळा नियमबाह्य पद्धतीने चालवली का? असा सवाल उपस्थित होत आहे. शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ चालवला असून या शाळेवर त्वरित योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी विविध विभागाला निवेदन सादर केले आहे.
सविस्तर वृत्त असे की मॅकरून स्टुडंट अकाडमी नावाने वडगाव टीप येथे सीबीएसईची इंग्लिश मीडियम शाळा आहे. या ठिकाणी प्राथमिक व माध्यमिकचे वर्ग भरायचे. मात्र गेल्या वर्षीपासून प्राथमिक शाळेचे 1 ते 4 वर्ष हे गंगशेट्टीवार मंगल कार्यालय येथे हलवण्यात आले. हे मंगल कार्यालय टिनाच्या शेडमध्ये आहे. विशेष म्हणजे या शाळेच्या अगदी समोर आधी पासूनच एक बियर शॉपी आहे.
शाळा प्रशासनाने नियम अटी बसवल्या धाब्यावर !
शाळा स्थानांतरीत करण्याआधी नगर पालिकेचे जागेबाबतचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे गरजेचे असते. याशिवाय शाळेसाठी जागा, परिसर, इमारत यासह काही नियम आणि अटी घालून दिल्या आहेत. मात्र येथे शाळेने अधिकाधिक नियम व अटींची पूर्तता केलेली नाही. तसेच काही नियम व अटी धाब्यावर बसवल्याचा आरोप होत आहे. या ठिकाणी आधीच बियर शॉपी असल्याने शाळेला परवानगी मिळालीच कशी? असा सवाल देखील या प्रकरणी उपस्थित केला जात आहे.
विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ नको – अजिंक्य शेंडे
मॅकरून शाळा ही पालकांकडून अवाढव्य फिस आकारत आहे. मात्र नियम धाब्यावर बसवून शाळा ही शाळा सुरू आहे. हा प्रकार म्हणजे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्याशी खेळ तर आहेच शिवाय ही पालकांची देखील फसवणूक आहे. उद्या विदयार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष धोक्यात आल्यास त्याला जबाबदार कोण राहणार? या शाळेवर त्वरित योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा विद्यार्थी व पालकांची फसवणूक थांबवण्यासाठी मोठे आंदोलन उभारले जाईल. – अजिंक्य शेंडे, उपजिल्हा प्रमुख, युवासेना
या प्रकरणी आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार, मुख्याधिकारी नगर परिषद, गटशिक्षणाधिकारी वणी यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. आता प्रशासन या शाळेवर काय कार्यवाही करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Comments are closed.