वणीत महापरिनिर्वाण दिनानिमित्त ठिकठिकाणी महामानवाला अभिवादन
समता सैनिक दलातर्फे कँडल मार्चचे आयोजन
विवेक तोटेवार, वणी: गुरुवारी 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त संपूर्ण वणी विभागात व शासकीय कार्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी समता सैनिक दलाद्वारे संध्याकाळी वणीत कँडल मार्चचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये वणीतील नागरिकांनी मोठ्या संंख्येेनेे सहभाग घेेेतलाा. महामानवाच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्याकरिता सर्व पक्षांचे पदाधिकारी यावेळी आंबेडकर चौकात जमले होते.
6 डिसेंबरला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण प्राप्त झाले होते. त्या निमित्त या महामानवाला अभिवादन करण्याकरिता प्रत्येक शासकीय कार्यालयात डॉ आंबेडकरांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. गुरुवारी सायंकाळी समता सैनिक दल, भारिप बहुजन महासंघ, भारतीय बौद्ध महासभा यांनी संयुक्तपणे रॅलीचे आयोजन केले. वणीच्या प्रत्येक प्रभागात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सर्व प्रभागातील बौद्ध बांधव सम्राट अशोक नगर बौद्ध विहारात जमले.
त्या ठिकाणी महामानवाच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. याच ठिकाणाहून कँडल मार्च काढण्यात आला. हा मार्च सम्राट अशोक नगर, टागोर चौक, गांधी चौक, जटाशंकर चौक, खाती चौक, टिळक चौक असा मार्गक्रमण करीत आंबेडकर चौकात आली. या ठिकाणी सर्वांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. या रॅलीच्या आयोजनात मिलिंद पाटील, मंगल तेलंग, किशोर मुन, दादाजी खडले, सज्जन रामटेके, नलिनी थोरात, नगराळे, ललिता तेलतुंबडे, सुष्मा दुधगवळी व सदस्य उपस्थित होते.
यावेळी वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, नगराध्यक्ष तारेन्द्र बोर्डे, ठाणेदार बाळासाहेब खाडे, दिनकर पावडे, रवी बेलूरकर, सामाजिक कार्यकर्ता नारायण गोडे व अनेक पक्षाचे अध्यक्ष , सदस्य व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.