विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातून एकाच पासवर अनेक फेऱ्या मारणारे व नियमाला धाब्यावर बसवून अवैध रेती वाहतूक करणारे सात ट्रॅक्टर व एक हायवा ट्रकला बुधावरी सायंकाळी वणी तहसील कार्यालयासमोर आणण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. वाहन मालकाला याबाबत खुलासा मागण्यात आला. यापैकी हायवा ट्रक थातुरमातुर खुलासा दिल्यानंतर सोडण्यात आला. एका ट्रकला सोडल्याने ही कार्यवाही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
याच मार्च महिन्यात तालुक्यातील एका रेती घाटाचा लिलाव झाला. नियमानुसार एका पासवर (रॉयल्टी) एकाच फेरीची परवानगी असते. परंतु अनेक रेती घाट घेणारे एका पासवर अनेक फेऱ्या मारीत असल्याचे वृत्त अनेकदा प्रकाशित करण्यात आले. परंतु कारवाई मात्र थंड बस्त्यात होती. असाच एक प्रकार बुधवारी वणीत घडला. बुधवारी सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास काही कामाकरिता उपविभागीय अधिकारी शरद जावळे व तहसीलदार श्याम धनमने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्रापासून जात असताना अचानक सात ट्रॅक्टर व एक हायवा ट्रक क्रमांक Mह 34 AV 1312 येतांना दिसला. त्यांना शंका आली असता त्यांनी वाहन चालकाला याबाबत विचारणा केली. परंतु उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने या सर्वांना वाहन घेऊन तहसील कार्यालयात आणण्यात आले. याबाबत सर्व वाहन धारकांना खुलासा मागण्यात आला आहे.
यातील हायवा वाहन धारकाने एक अजब खुलासा दिला आहे. ज्यात त्यांनी म्हटले आहे की, सदर वाहन हे सकाळी 10 वाजून 23 मिनिटांनी गोंडपीपरी येथून बल्लारशाह येथे जाण्यासाठी निघाले. गोंडपीपरी ते वणी याचे अंतर 190 किलोमीटर आहे. परंतु बल्लारशाह येथे रोडच्या काम सुरू असल्याने वाहन उशिर झाला. व वणी येथे वाय पॉईंटवर उपविभागीय अधिकारी यांनी वाहनाला तहसील कार्यालयात आणले. हा खुलासा देताच तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांनी वाहनाला सोडून दिल्याचा प्रकार घडला आहे.
गोंडपीपरी ते बल्लारशाह या रस्त्यात वणी कुठेच येत नाही. गोंडपीपरी ते वणी याचे अंतर 130 किलोमीटर आहे. बल्लारशाह येथे जाणार ट्रक वाणीत आला तरी कसा आणि या अशक्य खुलस्याची कोणतीही पडताळणी का केली नाही. या रस्त्याला लागणारे टोल टॅक्सच्या पावत्याही तपासणे अधिकाऱ्यांना गरजेचे वाटले नाही. यावरून या प्रकरणात सेटिंग तर झाली नसावी ना? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
हायवा वाहनावर नियमाचे उल्लंघन केल्यास पावणे तीन लाख रुपयांचा दंड आहे. परंतु याबाबत महसूल प्रशासन किती जगरूप आहे हे सदर प्रकरणावरून सहज लक्षात येते. अगदी पंधरा दिवसांगोदार अशाच प्रकारचे एक हायवा वाहन रेती तस्करीच्या संदर्भात पटवाऱ्याने आणले असल्याचीही माहिती आहे. परंतु या वाहनाचे पुढे काय झाले. याबाबत कुणालाही काही माहिती नाही.
रेती घाटाचा लिलाव न होता ही रेती तस्करी सुरूच होती. खाजगी कामे सुरूच होते परंतु महसूल प्रशासनाने कारवाई कोणतीही केली नाही. या प्रकरणात सात ट्रॅक्टर आणले आहे त्यावर महसूल प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे
.