मांगलीतील परवाना धारक देशी दारू दुकानातून लाखोंंची अवैध दारू विक्री
अबकारी व पोलीस विभागाचे झोपेचे सोंग
सुशील ओझा, झरी: जिल्हा दारूबंदी व्हावे याकरिता जिल्ह्यातील अनेक संघटना सरसावल्या असून शासनानेही गावपातळीवर समित्या नेमून प्रत्येक गावतील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी पावलं उचलले आहेत. मात्र शासनानेच परवाने दिलेल्या देशी दारूच्या दुकानातूनच खेडेगावात अवैधरित्या दारू पुरवठा होत असल्याचे समोर येत आहे.
तालुक्यातील मांगली येथे परवानाधारक देशी दारू दुकान आहे. या दारू दुकानातून दिवस रात्र देशी दारूच्या पेट्या या चारचाकीने घोंसा, मुकुटबन, खडकडोह, अडेगाव, पुरड व इतर गावात पाठवून विक्री केली जात आहे. देशी दारू दुकानातून अवैध दारू विक्री करणाऱ्या लोकांना २५०० ते २७०० रुपयांत एक दारूची पेटी विक्री करून महिन्याकाठी लाखो रुपयांचा व्यवहार अवैधरित्या सुरू आहे. याबत अबकारी विभाग व पोलीस विभागाने सपूर्ण माहिती असून मांजरी प्रमाणे डोळे बंद ठेऊन दूध पित आहे.
परवाना धारक दुकानदारांना नियमाने चिल्लर विक्रीचे अधिकार आहे. मात्र दररोज १०० ते २०० पेट्या दारू अवैधरित्या विकल्या जात आहे. तसेच ५२ रुपये ५० पैसे दारूच्या शिशीचा भाव असताना ५५ ते ६० रुपये विक्री करून ग्राहकांची लूट सुरू आहे. तसेच अल्पवयीन मुलांनाही दारू विकली जात आहे. दारू पिण्याचा परवाना असल्याशिवाय दारू देण्याचा अधिकार नसताना पैसे कमविण्याकरिता सर्वनाच दारूची विक्री केल्या जात आहे.
तालुक्यातील ७० टक्के जनता व्यसनाधीन झाली आहे. तर अनेकांचे जीवन उद्धवस्त झाले आहे. पैसे कमविण्याच्या नादात तरुण युवक दारू, जुगार, सट्टा, वरली मटक्याच्या आहारी जाऊन गुंडप्रवृत्तीचे झाल्याचे दिसत आहे.
गावाची लोकसंख्ये नुसार गावातील दारूविक्री किती होते याची माहिती अबकारी विभागाला माहीत असून सुद्धा जास्त सेल करणाऱ्या दुकानदाराला का जाब विचारला जात नाही किंवा शासकीय दरापेक्षा जास्त दराने विक्री करणाऱ्या दुकानदारावर कार्यवाही करून परवाना रद्द का केला जात नाही असा संतप्त प्रश्न उपस्तीत होत आहे.