क्रिकेट हे सामाजिक व धार्मिक सलोखा टिकवण्याचं माध्यम: तारेंद्र बोर्डे

आंतर शालेय नगराध्यक्ष क्रिकेट चषक स्पर्धेला थाटात सुरूवात

0

विवेक तोटेवार, वणी: शनिवार 13 ऑक्टोबर पासून वणीतील शासकीय मैदानावर आंतरशालेय नगराध्यक्ष चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. इलेव्हन स्टार क्रिकेट क्लब वणी व संलग्न विदर्भ क्रिकेट असोसिएशन नागपूर यांच्या द्वारा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 13 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे. स्पर्धेचे फायनल 17 ऑक्टोबर बुधवारी होणार आहे.

शनिवारी दुपारी या स्पर्धेचे उद्घाटन वणीचे नगरध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रामाच्या अध्यक्षस्थानी राजाभाऊ पाथ्रटकर, तर प्रमुख अतिथी म्हणून दिलीप मालेकर, संतोष बेलेकर, राजेंद्र मदान, मधूकर कोंगरे यांची उपस्थिती होती.

उद्धाटनप्रसंगी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे म्हणाले की
क्रिकेट हा असा खेळ आहे ज्यात सर्वांगिन विकासासोबत  समाजिक बंधुत्व व सलोखा जोपासला जातो. क्रिकेट खेळ लोकप्रिय असल्याने सर्व जाती धर्माचे खेळाडू यात एकत्र येतात. हा सलोखा कायम ठेवण्याचं काम क्रिकेट करत्ये. वणीमध्ये मोठ्या संख्येने उत्तमोत्तम खेळाडु आहेत त्यांना प्रोत्साहन मिळायला हवं. तसेच अशा स्पर्धेमधून खेळाडू तयार व्हावेत यासाठी या चषकाचं आयोजन करण्यात आलंय. वणीकरांनी याचा आनंद घ्यावा. असेही आवाहन त्यांनी केले.

या स्पर्धेत विजयी संघाला प्रथम बक्षीस सुवर्णचषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तर फायनलमध्ये पोहचलेल्या दुसऱ्या संघाला रजत चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.  याव्यतिरिक्त या स्पर्धेत वैयक्तिक बक्षीसही मोठया प्रमाणात देण्यात येणार आहे. ज्यामध्ये मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅस्टमन, बेस्ट विकेटकीपर याचा समावेश आहे.

उद्घाटनपर सामना हा लॉयन्स इंग्लिश मीडियम स्कूल आणि एसपीएम यांच्यात खेळला गेला. यात एसपीएम संघाने लॉयन्स स्कूलवर दणदणीत विजय मिळवला. यात अनिकेत दोडके याने धुंवाधार 33 रन्सची खेळी खेळली. तो या सामन्याचा सामनावीर ठरला. दुसरा सामना विवेकानंद विद्यालय व वणी पब्लिक स्कूल यांच्यात झाला. यात वणी पब्लिक स्कूल विजयी झाले. शादाब मलिक हा सामनावीर ठरला.

हे सामने बघण्यासाठी वणीकरांनी गर्दी करून खेळाडुंना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.