माणिकगढ सिमेंट चुनखडक खाणीत 1 ते 15 मे दरम्यान स्वच्छता पंधरवाडा

0

सुनील इंदुवामन ठाकरे, गडचांदूरः कामगार व रोजगार मंत्रालय, पश्चिम क्षेत्र नागपूर तथा डायरेक्टर जनरल ऑफ माईन्स सेफ्टीच्या अंतर्गत माणिकगढ सिमेंट चुनखडक खाणीत स्वच्छता पंधरवाडा साजरा केला जात आहे. दिनांक 1 मे ते 15 मे पर्यंत चालणाऱ्या या पंधरवाड्याचे उद्घाटन 1 मे रोजी झाले.

खणीकर्म अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला. नावकारी ग्रामपंचायतीच्या सरपंच लता उइके या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी होत्या. खाणीत ठिकठिकाणी स्वच्छता जनजागृतीचे फलक लावले होते. स्वच्छतेची शपथ आणि ध्वजारोहणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

कार्यक्रमाचे मुख्य अतिथी चीफ जनरल मॅनेजर एस. के. तिवारी आणि जनरल मॅनेजर आर. एस. अंभोरकर यांनी उपस्थितांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. सर्व कर्मचाऱ्यांना स्वच्छतेचे पालन कसे करावे व आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबतीत जागृत केले. आपल्या परिसरात प्लास्टिक, ज्वलनशील पदार्थ व इतर कचरा साचणार नाही याचीदेखील काळजी घेण्याचे आवाहन मान्यवरांनी केले.

या स्वच्छता पंधरवाड्यात कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचा सहभाग वाढविण्यासाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्यात. या अंतर्गत 5 मे रोजी चित्रकला स्पर्धा झाली. घोषवाक्य आणि पोस्टर स्पर्धा 7 मे रोजी होत आहे. स्वच्छतेचे महत्त्व या विषयावर 8 मे रोजी वर्क्तृत्त्व स्पर्धा होणार आहे. या स्वच्छता पंधरवाड्यात सर्वांनी सहभागी व्हावे अशी विनंती डेप्युटी जनरल मॅनेजर शैलेश सरपटवार यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.