विवेक तोटेवार, वणी: तालुक्यात नाफेडद्वारा तुरीची खरेदी ही सहा महिने झाल्यानंतरही पूर्ण झाली नाही. तर चना खरेदी अजून अर्धीसुद्धा न झाल्याने बळीराजा चांगलाच आर्थिक अडचणीत सापडला आहे.
पावसाळा सुरू झाल्याने शेतीची कामे जोमात सुरू झाली आहे. परंतु जवळ पैसा नसल्याने शेतकरी हा चांगलाच आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतमाल अजूनही घरी पडून आहे व शेतीला लावायला पैसा जवळ नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्याला कोण सावरणार याकडे अन्नदात्याचे लक्ष लागले आहे.
यावर्षी नाफेडद्वारा 20 जानेवारी ते 20 मार्च पर्यत शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली. यावेळी एकूण 2729 शेतकऱ्यांची नोंदणी नाफेड येथे करण्यात आली. यापैकी 1800 शेतकऱ्यांना तुरी विक्री करण्याकरिता बोलविण्यात आले. यापैकी प्रत्यक्षात मात्र 909 शेतकरीच हजर झाले. यांच्याकडून एकूण 7681.89 क्विंटल तुरीची खरेदी आतापर्यंत करण्यात आली. या सर्वांचे 10 जून पर्यंत तुरीची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचे पूर्ण चुकारे देण्यात आल्याचे माहिती खरेदी विक्री व्यवस्थापक देशपांडे यांनी दिली.
तर चना विक्री करणा-यांमध्ये 1257 शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली होती. यापैकी 30 जूनपर्यंत 291 शेतकऱ्यांना माल घेऊन बोलविण्यात आले. प्रत्यक्षात मात्र 274 शेतकरी आले व चना विक्री केली. यांच्याकडून एकूण 5335.45 क्विंटल इतका चना खरेदी करण्यात आला.
साठवणूक क्षमता कमी
खरेदी विक्री व्यवस्थापकाच्या म्हणण्यानुसार साठवणूक क्षमता कमी असल्याने खरेदी ही मंदगतीने सुरू आहे. लॉकडाऊन सुरू होण्याअगोदर 8 दिवस तुरी तर 8 दिवस चना खरेदी सुरू होती. यात माल अधिक येत असल्याने व माल ठेवण्याची व्यवस्था नसल्याने खरेदी कमी करावी लागत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातच बाजार समितीत खरेदी केलेला माल ठेवण्याची पुरेशी व्यवस्था नसल्याचे सांगण्यात आले.
आता पावसाळा सुरू झाला आहे. अद्यापही अनेक शेतकऱ्यांचा माल घरीच पडून आहे. तर काही जण आपला नंबर येईल या प्रतीक्षेत आहे. चना खरेदी अजून अर्ध्यासुद्धा शेतकऱ्यांची झाली नाही. जरी याबाबत पूर्ण खरेदी केली जाणार असल्याची ग्वाही दिल्या जात असली तरी सत्य परिस्थिती लवकरच लक्षात येईल. यातच बळीराजा चांगलाच आर्थिक अडचणीत सापडला आहे. माल घरी असल्याने हाती पैसे नाही. तर शेतीला लावायला सध्या पैशाची नितांत आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत पुन्हा कर्ज काढण्याची समस्या शेतकऱ्यांपुढे उभी झाली आहे.