मारेगाव एपीएमसी निवडणूक: गौरीशंकर खुराणा सभापती तर जीवन काळे उपसभापती

भास्कर राऊत, मारेगाव: क्षणाक्षणाला नाट्यमय वळण घेणाऱ्या मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी जनहित कल्याण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर खुराणा यांची सर्वानुमते निवड झाली. तर उपसभापतीपदी शिवसेनेचे जीवन काळे यांची एकमताने निवड झाली. अनेक दिग्गज नावांची चर्चा असताना अचानक दोन नवीन नावं समोर आल्याने ही निवड देखील अनेकांना धक्का देऊन गेली.

या निवडणुकीत अनेक दिग्गजानी आपले नशीब अजमावत दावेदारीही सिद्ध केलेली होती. यात जिल्हा परिषदेच्या माजी सभापती अरुणा खंडाळकर आणि बाजार समितीचे माजी उपसभापती वसंत आसूटकर यांचा समावेश होता. त्यामुळे सभापतीच्या निवडणुकीत मोठी चूरस निर्माण होईल असे बोलले जात होते. अशातच जनहित कल्याण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांचेही नाव समोर आले.

माजी उपसभापती वसंत आसूटकर यांचा प्रदीर्घ अनुभव पाहता त्यांना संधी मिळेल असा एक मतप्रवाह होता. अरुणा खंडाळकर यांना यावेळी ही संधी देण्यात यावी असा दुसरा मतप्रवाह होता. पण ऐन वेळेवर दोन्ही नावे बाजूला जात जनहित कल्याण संघटनेचे गौरीशंकर खुराणा यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

विश्राम गृहावर झाली साखर पेरणी
मारेगाव येथील विश्राम गृहावर पक्षश्रेष्टी माजी आमदार वामनराव कासावार, माजी आमदार विश्वास नांदेकर आणि माजी बाजार समिती सभापती नरेंद्र ठाकरे यांनी सर्व सभासदांची मते जाणून घेतली. यात बहुतांश सभासदांनी गौरीशंकर खुराणा यांच्या बाजूने आपले मत नोंदवल्याने गौरीशंकर खुराणा यांचे पारडे आधीच जड झाले. त्यामुळे गौरीशंकर खुराणा यांचा सभापती होण्याचा मार्ग सुकर झाला.

काँग्रेसने आघाडी धर्म पाळला
महाविकास आघाडीमध्ये सेना आणि काँग्रेस यांनी आघाडी करीत निवडणूक लढवली होती. त्यामुळे आघाडीचा धर्म पाळत काँग्रेसने सेनेला उपसभापती पद दिले.

राजी नाट्य की नाराजी नाट्य?
बाजार समितीच्या सभापती निवडीवेळी काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य असल्याची चर्चा सुरू होती. यात तीन संचालक निवडीच्या वेळी अनुपस्थित होते. त्यामुळे ते नाराज होते की आणखी काही हे मात्र कळू शकले नाही. सभापती उपसभापती निवडीची प्रक्रिया आर. व्ही. निनावे यांनी पार पाडली.

Comments are closed.