बहुगुणी डेस्क, वणी: मारेगाव तालुक्यातील एका शेतमजुराची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना सोमवारी दिनांक 22 सप्टेंबर 2025 रोजी रात्री घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारेगाव पोलीस घटनेचा तपास करीत आहे.
तक्रारीनुसार, फिर्यादी विशाल महादेव लाव्हे (वय 32 वर्ष) हा मारेगाव येथील वार्ड नं. 7 येथील रहिवासी आहे. तो मजुरी काम करतो. त्यांच्याकडे निळा-पांढरा पट्टा असलेली हिरो स्प्लेंडर प्लस मोटरसायकल (MH-29 AL-2075) आहे. 22 सप्टेंबर रोजी रात्री 8.30 वाजताच्या सुमारास विशाल मारेगाव मेन रोडवरील पान सेंटरवर खर्रा घेण्यास गेला होता. दरम्यान विशालने मोटरसायकल रस्त्यावर उभी केली. मात्र चावी न काढताच तो पानठेल्याकडे गेला.
खर्रा घेऊन परत आल्यावर त्याला त्यांची मोटरसायकल रस्त्यावर आढळली नाही. यानंतर त्याने मित्रासह मारेगाव ते वणी रोडवरील गौराळा फाट्यापर्यंत दुचाकीचा शोध घेतला, परंतु मोटरसायकल सापडली नाही. अखेर दुचाकी चोरी गेल्याचे लक्षात आल्यावर त्याने याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात बीएनएसच्या कलम 303(2) नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.


Comments are closed.