2014 ला ऐन विधानसभा निवडणुकीच्या आधी नैसर्गिक राजकीय मित्र असलेल्या सेना-भाजपची अचानक युती तुटली. वणी विधानसभा क्षेत्र हा सेनेच्या क्वोट्यात होता. त्यामुळे भाजपमध्ये विधानसभेची आधीपासून तयारी करण्याकडे विशेष असा कुणाचा कल नव्हता. विरोधक तर भाजपला निवडणुकीसाठी सक्षम उमेदवार देखील मिळणार नाही, अशी वल्गना करीत होते. मात्र ऐन वेळी ‘ऍक्सिडेंटली’ एक नाव पुढे आले ते म्हणजे संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे. ते आले, त्यांनी पाहिलं, ते लढले आणि त्यांनी जिंकून घेतलं. ही उक्ती लोकांनी सत्यात उतरताना पाहिली. त्यानंतर पुढील पाच वर्षांत त्यांचे नेतृत्त्वगुण, कामाची शैली, सर्वसामान्यांबाबतची तळमळ दिसून आली. आलेल्या संधीचे सोने करण्यासाठी त्यांनी वणी शहर व विधानसभा क्षेत्रात विकास कामांचा धडाका लावला. अनेक वर्षांपासूनचे रखडलेले कामं, अनेक वर्षांपासूनचे रस्ते, पाणी, नाट्यगृह, याची समस्या त्यांनी सोडवली. ते फक्त निवडणूक जिंकले नाहीत, तर त्यांनी लोकांचा विश्वास जिंकला. ही लोकप्रियता इतकी शिगेला गेली की जवळपास 25 हजारांची लीड घेऊन ते दुस-या निवडणुकीत पुन्हा निवडून आले. त्यामुळे ‘ऍक्सिडेंटल’ उमेदवार म्हणून राजकारणात दाखल झालेले संजीवरेड्डी पुढे वणी विधानसभा क्षेत्राचे ‘पॉप्युलर लीडर’ ठरले.
राजकारणाची सुरुवात…
माजी आ. संजीवरेड्डी बोदकुरवार हे मुळचे झरी तालुक्यातील लिंगटी गावचे. व्यवसाय आणि शेतकरी ही त्यांची मूळ ओळख. कुठलाही राजकीय वारसा नसताना तरुणपणी त्यांनी भाजपच्या माध्यमातून स्थानिक राजकारणात पाऊल ठेवले. 1992 मध्ये झरी-जामनी तालुक्याचे महामंत्री म्हणून त्यांना पक्षाने संधी दिली. पुढे 1997 ते 2001 दरम्यान झरी तालुका अध्यक्ष, त्यानंतर 2005 मध्ये त्यांना जिल्हा उपाध्यक्ष या पदासह वणी विधानसभा प्रमुख पदाची अतिरिक्त जबाबदारी दिली गेली. याच काळात ते महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीवर देखील होते. राजकारणासह ते सहकार व सामाजिक क्षेत्रातही कार्यरत होते. 2007 ते 11 या काळात ते वणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व लॉयन्स क्लबचे अध्यक्ष होते. त्यानंतर 2014 पासून पुढे दोन टर्म ते वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार राहिले. या काळात त्यांनी पक्ष संघटन मजबूत केले आणि सर्वसामान्यांच्या समस्या घेऊन रस्त्यावर उतरणारे कार्यकर्ते म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली.
नेतृत्वाचा नवा अध्याय सुरु स्वच्छ प्रतिमा, उत्तम जनसंपर्क व एक सक्षम उमेदवार असल्याने त्यांचे अल्पसंख्यांक होणे या मुद्दा देखील 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी गौण ठरला. निवडणूक कठिण होती. मात्र या वेळी विधानसभा प्रमुख म्हणून त्यांनी केलेली पक्षाची संघटन बांधणी यावेळी कामी आली. निवडणुकीचा निकाल लागला व उदय झाला एका नवीन नेतृत्त्वाचा. पहिल्याच टर्ममध्ये पाणी, रस्ते, नाट्यगृह, उद्याने, ग्रामीण भागातील नळ योजना, जलशुद्धीकरण, महिला सक्षमीकरण यांसारख्या अनेक प्रश्नांवर त्यांनी काम केले. यामुळे लोकांमध्ये त्यांची लोकप्रियता झपाट्याने वाढली. 2014 च्या निवडणुकीत त्यांनी अत्यल्प लीडने विजय मिळवला होता. मात्र 2019 मध्ये ही लीड तब्बल 25 हजारांवर गेली. हे त्यांच्यावरील मतदारांच्या विश्वासाचं आणि कामगिरीचं द्योतक होतं. सत्तेच्या गोडीत रमण्याऐवजी विकासकामे गतीमान करणारा, सर्वसामान्यांसाठी सदैव उपलब्ध असलेला आमदार म्हणून त्यांची प्रतिमा उभी राहिली.
जनतेच्या दरबारातून तयार झालेले नेतृत्त्व आजपर्यंत बहुतांश नेते आणि लोकप्रतिनिधींचे दरवाजे सर्वसामान्यांसाठी बंदच राहिले. मात्र संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या वाढत्या लोकप्रियतेमागे “जनता दरबार” ही मोठी ताकद ठरली. सकाळी 8 वाजता त्यांच्या निवासस्थानी जनता दरबार भरायचा. फक्त वणी शहरातीलच नाही, तर खेड्यापाड्यातील नागरिक, सर्व जातीधर्मांचे लोक, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने येथे विविध प्रशासकीय कामं, समस्या, गा-हाणे किंवा अर्ज घेऊन यायचे. हा दरबार साधारण दुपारी 11 वाजेपर्यंत सुरू राहायचा. कधी कधी तर दुपारी 1 पर्यंतही चालायचा. रोज सरासरी 300 ते 400 लोक यात सहभागी व्हायचे. यात “स्पिकर फोन ऑन – काम सुरु!” ही त्यांची पद्धत चांगलीच लोकप्रिय झाली होती.
जनता दरबारात अधिका-यांशी बोलताना संजीवरेड्डी बोदकुरवार
एखाद्या नागरिकाने आपली समस्या मांडताच बोदकुरवार लगेच संबंधित अधिकारी, कर्मचारी किंवा जबाबदार व्यक्तीला फोन लावायचे. हा फोन स्पिकरवर टाकला जायचा. त्यामुळे लोकांसमोरच थेट चर्चा व्हायची. त्यामुळे त्यांच्या घरी काम घेऊन आलेली व्यक्ती कधीही निराश होऊन गेली नाही. विशेष म्हणजे याच जनता दरबारातून त्यांची ‘जनतेचा नेता’ अशी ओळख निर्माण झाली व यानेच त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेले. विशेष म्हणजे आज त्यांच्याकडे पद नसले, आज ते लोकप्रतिनिधी नसले तरी ही आजही हा जनता दरबार सुरु असतो.
संजीवरेड्डी यांच्या घरी चाललेला जनता दरबार
कोणताही राजकीय वारसा नसतानाही जनतेच्या मनात घर करणारा नेता अशी त्यांची इमेज तयार झाली. संघटन कौशल्य, जनसंपर्क आणि ठाम भूमिका—या त्रिसूत्रीवर उभा राहिलेला विश्वासाचा किल्ला आजही अभेद्य आहे. आज त्यांचा वाढदिवस. “ऍक्सिडेंटल उमेदवार” म्हणून सुरू झालेली त्यांची वाटचाल आज लोकप्रिय आमदार या शिखरावर पोहोचली. त्यांचा हा प्रवास तरुण नेत्यांसाठी अपघाताने सुरू झालेली सफर कशी यशस्वी होते, हे दाखवतो. सामान्य माणसाशी निगडित प्रश्नांवर आवाज बुलंद करणारा, कामातून विश्वास मिळवणारा हा प्रवास अनेक तरुण कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि आणखी यश प्राप्त होवो, अशी शुभकामना. (लेखक – निकेश जिलठे, संपादक वणी बहुगुणी)
माजी आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…. शुभेच्छुक शहर भाजप
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Comments are closed.