मारेगाव येथील “जनता कर्फ्यू” यशस्वी
छोट्या-मोठ्या दुकानदारांनी दिली, देशी दारूच्या दुकानदारांनी दाखवली पाठ
नागेश रायपुरे, मारेगाव : तालुक्यात कोरोना व्हायरसचा वाढता प्रकोप पाहता, जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टिने कोरोनाची साखळी खंडित व्हावी या हेतूने चेंबर्स ऑफ कॉमर्स मारेगावच्या पुढाकारातून मारेगाव शहरात घेण्यात आलेला चार दिवसाचा “जनता कर्फ्यू” हा यशस्वी झाला. छोट्या-मोठ्या दुकानदारांनीसुद्धा या जनता कर्फ्फुला साथ दिली. परंतु देशी दारूच्या दुकानदारांनी साथ न देता जनता कर्फ्यू पाठ दाखवल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती.
चेंबर्स ऑफ कामर्स या शहरांतील व्यापारी संघटनेद्वारे तालुक्यात वाढत असलेला कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात 17 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर या कालावधीत चार दिवसाचा उत्फुर्त “जनता कर्फ्यू” घेण्याचा निर्णय घेण्यात आला. याला प्रतिसाद देत शहरातील लहान-मोठ्या दुकानदारांनी चारही दिवस आपली दुकाने बंद ठेवल्याने शहरातील बाजारपेठ कडकडीत बंद होती.
हा निर्णय व्यापाऱ्यांनी जनहितार्थ घेतला. ज्या प्रमाणात दुकाने बंद होती त्यांच प्रमाणात संसर्गाचा धोका नक्कीच कमी झाला असेल. दुकाने बंद असल्यामुळे संबंधित ग्राहक, नागरिक बाजारात आले नाहीत. त्यामुळे शहरात गर्दी झाली नसल्याने संसर्गाची साखळी काही प्रमाणात खंडीत झाली.
व्यापाऱ्यांनी संघटित होऊन जनतेच्या सुरक्षेसाठी केलेले कार्य तसेच जनतेने दिलेले समर्थन व सहकार्य त्या बद्दल चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले. जनता कर्फ्यूच्या चार दिवसांच्या कालावधीत शहरातील वाईनबारसह सर्व लहान-मोठी दुकाने एकीकडे बंद असताना दुसरीकडे शहरातील चारही देशी दारूच्या दुकानदारांनी आपली दुकाने चालू ठेवली.त्यामुळे रोष व्यक्त होत आहे.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)