मुंबई गुन्हे शाखेचा छापा; दोन युवक चौकशीसाठी ताब्यात

संशयास्पद आर्थिक व्यवहार, हवाला नेटवर्कशी संबंधाचा संशय

विकेक तोटेवार, वणी: रविवारी मुंबई गुन्हे शाखेचे पथक वणीत पोहोचलं व या पथकाने धाड टाकत नांदेपेरा येथील दोन युवकांना ताब्यात घेतले. या मुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. संशयास्पद आर्थिक व्यवहार आणि हवाला नेटवर्कशी संबंधित चौकशीसाठी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई गुन्हे शाखेचे अधिकारी स्थानिक पोलिसांच्या मदतीने नांदेपेरा येथे पोहोचले. तेथे दोन युवकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. या कारवाईदरम्यान संबंधित युवकांचे मोबाईल फोन, आर्थिक व्यवहाराशी संबंधित कागदपत्रे तसेच काही इलेक्ट्रॉनिक साहित्य तपासासाठी जप्त करण्यात आल्याची चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेले युवक काही काळापासून संशयास्पद आर्थिक व्यवहारांमध्ये सक्रिय असल्याचा संशय तपास यंत्रणांना होता. हवाला नेटवर्कद्वारे पैशांची देवाणघेवाण आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या दृष्टीने या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे समजते.

मुंबई गुन्हे शाखेच्या या कारवाईनंतर शहरात विविध चर्चांना उधाण आले असून संबंधित प्रकरणात आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, अधिकृत पातळीवर अद्याप सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, तपास यंत्रणा ताब्यात घेतलेल्या युवकांच्या संपर्कातील इतर व्यक्ती, बँक व्यवहार आणि आर्थिक व्यवहारांची साखळी तपासत असल्याची माहिती मिळत आहे.

Comments are closed.