मारेगावातील 3 प्रभागासाठी विक्रमी मतदान, आज लागणार निकाल

उमेदवारांची धाकधूक वाढली, सर्वच उमेदवारांचा विजयाचा दावा

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव नगरपंचायतच्या 17 जागांपैकी उर्वरित 3 वार्डासाठी मंगळवारी दिनांक 18 जानेवारी रोजी शांततेत मतदान पार पडले. या तीन जागांच्या मतदानासाठी नागरिकांमध्ये चांगलाच उत्साह दिसून आला. या जागांसाठी एकूण 82.74 टक्के मतदान झाले. गेल्या महिन्यात झालेल्या इतर वार्डातील मतदानापेक्षा हा आकडा अधिक आहे. आज सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरूवात होणार असून कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गेल्या महिन्यात 17 पैकी 14 प्रभागासाठी निवडणूक झाली होती. तर ओबीसी आरक्षणामुळे 5, 6, 14 या प्रभागात दुस-या टप्प्यात निवडणूक झाली. अतिशय चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीमध्ये काय निकाल लागेल याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. सर्वच पक्ष आपापल्या पद्धतीने आपल्या किती जागा निवडून येईल याचे गणित मांडतांना दिसून येत असले तरी उमेदवारांची धाकधूक मात्र वाढलेली आहे.

या निवडणुकीत सर्वच प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणावर मतदान झालेले असून कोण कोणाच्या घरी बँड वाजवणार हे काही तासानंतर स्पष्ट होणार आहेत. या निवडणुकीमध्ये काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आणि वंचीत आघाडी, शहर विकास आघाडी व संभाजी ब्रिगेड यांची आघाडी मोठ्या चुरशीने या निवडणुकीच्या मैदानात उतरलेली होती.

आता नगरपंचायतच्या सिंहासनावर कोण आरूढ होणार? कोणाच्या गळ्यामध्ये विजयाची माळ पडणार हे उद्या दुपारपर्यंत स्पष्ट होणार असून कोणाचा गुलाल उधळला जाईल हे लवकरच स्पष्ट होणार आहेत.

हे देखील वाचा:

परमेश्वरी जगमोहनजी पोद्दार यांचे निधन

Comments are closed.