मारेगाव पंचायत समितीने केले शिक्षिकेचे परस्पर समायोजन

गटशिक्षणाधिका-यांच्या कुटुंबातीलच प्रकार, मुख्य कार्यकारी अधिका-यांची दिशाभूल केल्याचा आरोप

0
वणी: मारेगाव तालुक्यातील नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय शिक्षकांच्या समायोजनात एका शिक्षीकेचं सोयीच्या गावात समायोजन केल्याची चर्चा सध्या शिक्षकांच्या वर्तुळात रंगलीये. या शिक्षिकेचं समायोजन टोकाच्या गावात झालं होतं. मात्र समायोजन प्रक्रियेत त्यांना अनुपस्थित ठेवून तालुका स्तरावरून त्यांचं समायोजन करण्यात आलंय, असा आरोप होतोय. महत्त्वाचं म्हणजे म्हणजे ही शिक्षिका स्थानिक शिक्षण विभागातील अधिका-याच्या कुटुंबातील व्यक्ती असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे हा सर्वसामान्य शिक्षकांवर एक प्रकारे अन्याय असल्याचं दिसून येतंय.

 

मागील काळात जिल्हा परिषदेनं अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन केलं होतं. त्यानंतर शिक्षकांचं समायोजन करण्याची प्रक्रिया थांबली होती. ज्या शिक्षकांचं समायोजन करण्यात आलं होत, त्यात काही महिला शिक्षकांना टोकावरची गावे मिळाली होती. अशा महिला शिक्षिकांनी विनंती करून सोईचं गाव देण्यासंबंधी वरिष्ठांकडे अर्ज केले होते. मात्र वरिष्ठांनी यावर काहीही उपाय नसल्याचं सांगितलं.

 

गेल्या आठवड्यात जिल्हा परिषदेच्या सभागृहात अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचं समायोजन करण्यात आलं. त्यात वणी पंचायत समितीचा आक्षेप असल्यानं त्याचं शुक्रवारी समायोजन करण्यात आलं. समायोजन करतांना स्थानिक पंचायत समिती शिक्षण विभागानं रिक्त गावांची यादी देणं गरजेचं होतं. पण मारेगाव पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी रिक्त गावे न दाखविता समायोजनाला उपस्थित झाले. सभागृहातच रिक्त गावांची माहीती सादर करण्यात आली. त्यात तालुक्यातील वरूड शाळा रिक्त असल्याची कुठेही नोंद नव्हती. परिणामी या शाळेवर कोणत्याही शिक्षकांचे समायोजन करण्यात आले नाही.

 

जिल्हा स्तरावरून करण्यात आलेल्या समायोजनात केवळ तीन शाळा रिक्त राहील्या होत्या. तर उर्वरित शिक्षकांचे समायोजन करण्यात आले होते. जिल्हा स्तरावरून टोकाच्या गावाला समायोजन झाल्यानंतर येथील गटशिक्षणाधिका-यांनी रिक्त गाव दाखविले नसतांना कुटुंबातीलच व्यक्तीला जवळच्या गावात समायोजन करून नियुक्ती दिल्याची चर्चा सध्या शिक्षकांमध्ये रंगली आहे.

(शिक्षकांच्या मागणीसाठी भरवली बिडीओंच्या कक्षातच शाळा)

परिणामी शिक्षण विभाग हा केवळ कुटुंबातील कर्मचार-यांसाठीच आहे का असा प्रश्न शिक्षक उपस्थित करीत आहे. मारेगाव येथील गटशिक्षणाधिका-यांनी वरिष्ठांची दिशाभूल करीत समायोजनात संबधीत शिक्षिकेला गैरहजर ठेवून तालुकास्तरावरून सोईचे गाव देण्याचा खटाटोप केल्याचा आरोप होतोय, याबाबत शिक्षण विस्तार अधिकारी ढवळे यांना विचारणा केली असतां त्यांनी याबाबत कोणतीही माहीती नसल्याचं सांगून माहिती देण्यास टाळाटाळ केली आहे. या प्रकारावरून सर्वसामान्य शिक्षकांवर एकप्रकारचा अन्यायच झाला असल्याचं दिसून येत आहे. या गंभीर प्रश्नाकडे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष घालेल काय असा प्रश्न सध्या विचारला जातोय.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.