शिक्षकांच्या मागणीसाठी भरवली बिडीओंच्या कक्षातच शाळा

शिक्षक न मिळाल्यास 15 ऑगस्टला ठोकणार शाळेला टाळे, पालकांचा इशारा

0
वणी: वणी पंचायत समिती अंतर्गत येणा-या ढाकोरी येथील वर्ग 1 ते 8च्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मागणीसाठी चक्क गटविकास अधिका-याच्या कक्षातच ठिय्या मांडून आंदोलन केलं. विद्यार्थ्यांच्या या मागणीवर 10 तारखेला चर्चा करून शिक्षक देण्याचं आश्वासन गटविकास अधिका-यांनी दिलं. जर 10 तारखेपर्यंत या विषयावर तोडगा निघाला नाही तर 15 ऑगस्टला मोठं आंदोलन उभारलं जाईल असा इशारा पालकांनी दिलाय.
वेळाबाई केंद्रांतर्गत ढाकोरी ही जिल्हा परिषदेची शाळा येते. इथल्या वर्ग 1 ते 5 मध्ये 45 विद्यार्थी आहेत. तर 6 ते 8 या वर्गात 45  विद्यार्थी आहे. वर्ग 1 ते 5 ला शिकविण्यासाठी दोन शिक्षकांची नेमणूक आहे, तर 6 ते 8 वर्गासाठी केवळ एकच शिक्षक आहे. त्यातच शिक्षकांकडे मतदार यादीची कामे, मुख्याध्यापकाची कामे अशी अनेक कामं आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान होत आहे.
नुकत्याच झालेल्या समायोजनात ढाकोरी येथे एकाही शिक्षकाचे समायोजन शिक्षण विभागानं केलेलं नाही. याउलट तालुक्यातील तीन शिक्षक इतर तालुक्यात हलविण्यात आले आहे. यावरून वणी पंचायत समितीतील शिक्षण विभाग या विषयाकडे गांभीर्यानं बघत नाही असं स्पष्ट होत आहे. ढाकोरी येथील शाळा व्यवस्थापन समितीने वारंवार पंचायत समितीला शिक्षक देण्यासंबधीचे निवेदन सादर केले आहे. पण पंचायत समितीने याकडे कायम दुर्लक्ष केलं आहे, असा आरोप पालकांनी केला आहे.
पंचायत समिती शिक्षकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्यानं अखेर पालकांनी पंचायत समितीविरोधात एल्गार पुकारत 65 विद्यार्थ्यांना सोबत घेऊन गटविकास अधिका-यांच्याच कक्षात शाळा भरवून आंदोलन केलं. यावेळी ढाकोरी येथील शाळा व्यवस्थापन समिती, पालक, महिला मोठ्या संख्येनी उपस्थित होत्या.

दरम्यान गटविकास अधिकारी राजेश गायनार यांनी येत्या 10 तारखेला यावर विचारविमर्श करून तोडगा काढण्याचे आश्वासन संबधीताना दिले. मात्र पालकांचे समाधान झाले नाही. त्यांनी येत्या 10 तारेखेला शिक्षक न दिल्यास 15 आॅगष्टला स्वातंत्र्यदिनी शाळेला कुलूप ठोकून आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

 

वणी पंचायत समितीच्या शिक्षण विभागात सध्या भोंगळ कारभार दिसून येत आहे. समायोजनात अनेक त्रृटी असल्याचा आरोप होतोय. मर्जीतील शिक्षकांसाठी काही खास जागा सुध्दा सोडण्यात आल्या, तसंच मर्जीतील शिक्षकांना जवळचे गावे मिळण्यासाठी येथील अधिका-यांनी खटाटोप केल्याचा आरोप होतोय. शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे ग्रामीण भागातील शाळा ओस पडत आहेत. शिक्षक नसल्यानं कित्येक पालक त्यांच्या मुलांना बाहेरगावात शिक्षणासाठी पाठवत असल्याचं दिसत आहे. मात्र या गंभीर प्रश्नाकडे जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचं दिसून येत आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.