बहुगुणी डेस्क, वणी: शेतमजुरी करणाऱ्या दांपत्याच्या तीन अल्पवयीन मुलांना एकाने पळवून नेले. यात एक मुलगी (9) व दोन चिमुकल्या मुलांचा समावेश आहे. 19 सप्टेंबर रोजी संध्याकाळी मारेगाव तालुक्यातील एका शेतशिवारात ही घटना घडली. आरोपीने चांगले शिक्षण देतो, चांगले पालन पोषण करतो अशी फूस लावून मुलांना पळवून नेले. याबाबत तक्रारीची नोंद झाली असून, या प्रकरणी आरोपीवर बीएनएसच्या कलम 137 (2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार हा मारेगाव तालुक्यातील एका गावातील रहिवासी आहे. तो शेतमजुरीचे काम करतो. दोन वर्षांआधी तो निशानघाट, जि. अदिलाबाद येथे शेतीचे काम करीत होता. दरम्यान तिथे त्याची एका महिलेशी (वय 38) ओळख झाली. ती देखील शेतमजुरीचे काम करायची. त्यांच्या ओळखीचे रुपांतर पुढे प्रेमात झाले. ओळख झाल्यानंतर तीन महिन्यातच दोघांनी लग्न केले. महिलेला पहिल्या पतीपासून 2 मुलं व दोन मुली आहेत. त्यातील मोठ्या मुलीचे लग्न झाले आहे.
लग्नानंतर पत्नी व तिच्या 3 मुलांना घेऊन पती मारेगाव तालुक्यात आला. तालुक्यातील एका शेतात तो सालगडी म्हणून काम करायचा व शेतातच तो राहायचा. निशानघाट येथे काम करताना त्याच्या पत्नीची आरोपी देवीदास (44) याच्याशी ओळख होती. आरोपी मुळचा यवतमाळ जिल्हयातील असून तो तिथे शेतमजुरीचे काम करायचा.
शुक्रवारी दिनांक 19 सप्टेंबर रोजी संध्याकाळी देवीदास घरी आला. यावेळी पती पत्नी दोघेही शेतात काम करीत होते. दरम्यान देवीदासने मी तुझ्या मुलांचे चांगले पालन पोषण करतो. त्यांना चांगले शिक्षण देतो अशी भुलथाप पती पत्नीला दिली. त्यानंतर आरोपी तिन्ही मुलांना घेऊन निघून गेला. थोड्या वेळाने पती पत्नी घरी आले असता त्यांना तिन्ही मुलं घरी आढळून नाही. त्याने आरोपीच्या मोबाईलवर कॉन्टॅक्ट केला असता त्यांना आरोपीचा नंबर स्विच्ड ऑफ आढळला.
दुस-या दिवशी मुलांचा शोध घेण्यासाठी त्यांची आई निशानघाट आरोपी राहत असलेल्या घरी गेली. मात्र तिला आरोपी व तिची मुलं आढळले नाही. अखेर पती पत्नीने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्याचा निर्णय घेतला. पतीच्या तक्रारीवरून आरोपी देविदास विरोधात तीन मुलांना फूस पळवून नेल्याच्या आरोपावरून बीएनएसच्या कलम 137 (2) नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.



Comments are closed.