बहुगुणी डेस्क, वणी: मारेगाव तालुक्यातील कोरंबी (मारेगाव) गावात सोशल मीडियावर स्टेटस टाकण्यावरून उफाळलेल्या वादाने हिंसक वळण घेतले. एका तरुणावर लाकडी दांड्याने डोक्याला आणि डाव्या डोळ्याखाली जोरदार मार करून जखमी करण्यात आले, तर त्याच्या आजींना ढकलून खाली पाडून गंभीर दुखापत पोहोचवण्यात आली. या घटनेत दोन्ही पीडित जखमी झालेत. शनिवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. हल्ला करणा-या तरुणावर व त्याच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, फिर्यादी प्रकाश रमेश घोसले (वय 27) हा मारेगाव (कोरंबी) ता. वणी येथील रहिवासी आहे. तो त्याची आजी शशिकला मारोती घोसले (वय 62) यांच्यासह राहतो. ते मजुरीचे काम करतात. गावातच आरोपी गौरव महादेव मेश्राम (वय 23) आणि त्याचे वडील महादेव मेश्राम (वय 55) राहतात. हे नेहमी दारू पिऊन वाद घालत असतात, असा प्रकाश यांचा आरोप आहे.
स्टेटस ठरले वादाचे निमित्त
शनिवारी दिनांक 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 8:30 वाजता प्रकाश घरासमोर उभा होता. दरम्यान घरासमोरून गौरव जात होता. प्रकाशने गौरवला आपले आपसात पटत नसताना त्याच्या डान्सचे स्टेटस मोबाईलवर का ठेवले, असा सवाल केला. त्यावर गौरवने “तुझ्याच्याने जे होईल ते करून घे” असे म्हणाला. यातून वाद वाढत गेला. दरम्यान यात गौरवचे वडील महादेव लाकडी दांडा घेऊन आले आणि प्रकाशला शिवीगाळ करत ढकलले. त्यानंतर गौरवने वडिलांच्या हातातील दांडा घेऊन प्रकाशच्या डोक्यावर मारला. यात त्याला गंभीर दुखापत झाली.
दरम्यान वाद सुरु असताना प्रकाशची आजी शशिकला या वाद सोडवण्यासाठी मध्यस्थीला आल्या. गौरवने तिला ढकलून दिले, ती खाली पडून तिच्या डोक्याला जखम होऊन रक्त निघाले. या घटनेनंतर गौरव आणि महादेव यांनी प्रकाशला “एखाद्या दिवशी कु-हाडीने तोडून टाकू” अशी जीवे मारण्याची धमकी दिली आणि नंतर निघून गेले.
प्रकाशने ही घटना वणी पोलिस स्टेशनमध्ये नोंदवली असून, त्याच्या तक्रारीवरून गौरव महादेव मेश्राम आणि महादेव मेश्राम यांच्यावर भा. न्या. संहितेच्या (बीएनएस) कलम 118(1), 125(a), 3(5), 351(2), 351(3), 352 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.





Comments are closed.