बहुगुणी डेस्क, वणी: छोटीशी ठिणगी संपूर्ण जंगल पेटवते. तसाच एक वाद कधीचाच बाद झाल्यावर कुणीतरी पुन्हा उकरतो. पुढं बाचाबाची सुरू होते. नंतर शिवीगाळ आणि शेवटी मारहाण. अशीच घटना वणी जवळच्या नवीन लालगुडा येथे घडली. फिर्यादी जितेंद्र महादेवराव डहाके (40) यांला त्याच्या जुन्याच परिचिताने शिविगाळ करीत मारहाण केली. जितेंद्र डहाके यांनी वणी पोलिसात तक्रार दाखल केली.
तक्रारीनुसार फिर्यादी जितेंद्र महादेवराव डहाके (40) नवीन लालगुडा येथे परीवारासह राहतात. ते उदरनिर्वाहाचं साधन म्हणून रोजमजुरीचं काम करतात. अशाच कामांच्या माध्यमातून त्यांची वणीतील खरबडा मोहल्ल्यातील शंकर किनाके याच्यासोबत दोन-तीन वर्षांपूर्वी ओळख झाली. ते सोबतच मजुरीचे काम करत होते. मग एके दिवशी काही कारणावरून त्यांच्यात भांडण झालं. तो वाद विकोपाला गेला. तेव्हापासून त्यांनी एकमेकांशी बोलणं बंद केलं.
शनिवार दिनांक 19 एप्रिलच्या सायंकाळचे जवळपास 5.30 वाजले होते. जितेंद्र हा खरबडा मोहल्ला येथील एका किराणा दुकानाजवळ उभा होता. अचानक आरोपी शंकर किनाके फिर्यादीच्या जवळ आला. जितेंद्रला आधी काहीच कळलं नाही. शंकरने जितेंद्र सोबत वाद घालायला सुरुवात केली. जुन्या भांडणाचा मुद्दा आरोपीने पुन्हा उचलला. त्याने जितेंद्रला शिवीगाळ केली. त्यावर जितेंद्रने शिवीगाळ कशाला करीत आहेस म्हणून विचारलं. त्याच क्षणी शंकरने त्याच्या हातातील लाकडी काठीने जितेंद्र याच्या डोक्यावर, दोन्ही पायांवर आणि कंबरेवर मारुन त्यांना जखमी केलं.
एवढंच नव्हे तर जितेंद्रला एखादे दिवशी मारुन टाकण्याची धमकी देखील दिली. मारहाणीनंतर शंकर तिथून निघून गेला. या घटनेनंतर जितेंद्र याने वणी पोलीस ठाण्यात आरोपी शंकर कनाके विरोधात तक्रार नोंदवली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 2023 कलम 118(1), 351(2), 351(3) आणि 352 अन्वये गुन्हे दाखल केलेत. पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत.
Comments are closed.