बघता बघता जमिनदोस्त झाले घर, वाहून गेलं सर्वकाही
सुशील ओझा, झरी: निरंतर सुरू असलेल्या पावसाने तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले. तालुक्यातील मार्की येथे दीपक सुरपाम यांचं घर होतं. पावसाचा मारा वाढतच होता. अशातच पावसाने जोर धरला. दीपकचं कुडाचं घर क्षणार्धात जमिनदोस्त झालं. निसर्गाच्या या कहरानं घरातील संपूर्ण धान्य, वस्तूंचं पूर्ण नुकसान झालं. दीपकच्या उद्याच्या उज्ज्वलतेवर पावसाने गडद काळोखी सावली पसरली. ‘‘आसमानी व सुलतानी’’च्या दुष्टचक्रात अडकेल्या दीपकवर पुन्हा आसमानी संकट कोसळलं. कोसळल्या घरासोबत त्यांची अनेक स्वप्नंदेखील अशीच कोसळीत.
दीपकचं घर पावसामुळे जमीनदोस्त झाल्याने पूर्ण कुटुंब उघड्यावर आले आहे. दोन दिवसापासून पावसाने कहर केला. मार्की येथील दीपक सुरपाम या आदिवासी युवकाचे कुडाचे घर संततधार पावसामुळे संपूर्ण खचून जमीनदोस्त झाले. त्यात सुरपाम यांचे १ लाख ५० हजाराचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला.
घराचे चारशे कवेलू, गहू ८ क्विंटल, ज्वारी ७ क्विंटल, १ क्विंटल तांदूळ, दरवाजा, टीव्ही, लाकूड फाटे व इतर जीवनावश्यक वस्तूचे नुकसान झाले. सुरपाम यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. घर नुकसानीची माहिती महसूल विभागाला कळताच पटवारी राणे व कोतवाल प्रवीण जुमनाके यांनी पंचनामा केला. तहसील कार्यालयात अहवाल सादर केला आहे. मार्की गाव पेसामध्ये असून गावात ग्रामपंचायतीने कोणत्याही सुविधा दिल्या नाहीत. रस्ता व नालीसुद्धा नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी अनेक तक्रारी वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत करून मतदानावर बहिष्कार घालण्याचा सुद्धा निर्णय घेतला. अजूनही कोणतीच सुविधा नसल्याने अनेक घरे अशीच कोसळण्याच्या मार्गावर असल्याची माहिती आहे. सुरपाम यांच्या घरात आई, भाऊ, मुले असे ५ जणांचे कुटुंब आहे. सर्व कुटुंबच उघड्यावर पडलं. शासनाने त्वरीत मदत द्यावी, अशी मागणी दीपक सुरपाम यांनी केली आहे.