विवाहितेची नांदेपेरा रोडवर दगडाने प्रहार करून निर्घृण हत्या

मृतक वणीतील पटवारी कॉलनी येथील रहिवाशी

0

जितेंद्र कोठारी, वणी: आज शुक्रवारी दिनांक 11 डिसेंबर रोजी सकाळी वणीतील नांदेपेरा रोडवर वांजरी शेत शिवारात एका महिलेचा मृतदेह आढळून आला. सदर महिलेची दगडाने प्रहार करून निर्घृण हत्या झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याने शहरात एकच खळबळ उडाली. दरम्यान सकाळी या महिलेच्या मृतदेहाचे फोटो व्हॉट्सऍपवरून व्हायरल झाले. तिथूनच या महिलेची ओळख पटली. मृतक महिला विवाहित असून ती वणीतील पटवारी कॉलनी येथे एका घरी भाड्याने राहत होती अशी माहिती समोर आली आहे. 

Podar School 2025

मृतक जया मनोज आवारी (32) ही मुळची तालुक्यातील पिंपळगाव येथील रहिवाशी होती. काही वर्षांपूर्वी तिचे वरोरा येथील एका तरुणाशी लग्न झाले होते. त्यानंतर ती तिच्या पतीसोबत वरो-याला राहत होती. मात्र 6 वर्षांआधी ती पतीपासून विभक्त झाली. तेव्हापासून ती वणीतील बस डेपोच्या मागे असलेल्या पटवारी कॉलनी परिसरातील एका घरी तिच्या 10 वर्षीय व 6 वर्षीय मुलासह भाड्याने राहत होती. काल रात्री 8 वाजताच्या सुमारास (गुरुवारी) ती मुलांना मामाच्या घरी जाऊन येते असे सांगून घरून निघाली, मात्र ती बराच वेळ पर्यंत घरी परतली नाही. त्यामुळे तिचे परिचीत व नातेवाईक रात्रीपासून तिचा शोध घेत होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

वणी-नांदेपेरा रोडवर रसोया फॅक्ट्रीपासून काही अंतरावर बडवाईक यांचे शेत आहे. आज सकाळी त्यांच्या सालगड्याला गोठ्यातून बैल बाहेर काढत असताना बाजुला एका महिलेचा मृतदेह आढळून आला. मृतदेह पाहताच सालगड्याने याची माहिती त्याच्या मालकाला दिली. मालकांनी लगेच याची माहिती वांजरी येथील पोलीस पाटलाला दिली. पोलीस पाटलाने याबाबत वणी पोलिसांना माहिती दिली. सकाळी 9.30 वाजताच्या दरम्यान वणी पोलिसांची चमू घटनास्थळी दाखल झाली. त्यांना महिलेवर दगडाने मागून हल्ला झाल्याचे निदर्शनास आले.

व्हॉट्सऍपवरून पटली ओळख
सकाळी वणीतील विविध व्हॉट्सऍप नांदेपेरा रोडवर एका तरुणीचा दगडाने ठेचून हत्या केल्याचा मॅसेज आणि फोटो व्हायरल झाला. हा फोटो मृतक महिलेच्या चुलत भावाच्या व्हॉट्सऍपवर आला. दरम्यान त्यांना मृतक महिलेचे वडील भगवान मत्ते रा. पिंपळगाव ता. वणी यांचा कॉल आला. त्यांनी त्यांची मुलगी काल रात्रीपासून बेपत्ता असल्याची माहिती दिली. त्यावर मृतकाच्या चुलत भावाने व्हॉट्सऍपवर नांदेपेरा रोडवर एक मृतदेह आढळल्याचा फोटो व्हायरल होत असल्याचे सांगितले व आलेला फोटो त्यांनी मृतक महिलेच्या वडिलांना पाठवला. फोटो बघताच भगवान मत्ते यांना तो मृतदेह त्यांच्याच मुलीचा असल्याचे लक्षात आले. त्यांनी त्वरित कॉलबॅक करून याची माहिती आपल्या पुतण्याला दिली. मृतक महिला आपली चुलत बहिण असल्याचे कळताच ते घटनास्थळी पोहोचले व त्यांनी मृतकाची ओळख पोलिसांना दिली.

दगडाने प्रहार करून एका महिलेची हत्या केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊऩ उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार, सहा.पो.नि. एकाडे, सपोनि माया चाटसे घटना स्थळी दाखल झाले. सदर घटना मध्यरात्रीच्या दरम्यान झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

महिला तिथे पोहोचली कशी?
मामाच्या घरी जाते सांगून मृतक महिला रात्री 8 वाजताच्या दरम्यान निघून गेली व दुस-या दिवशी शहराबाहेरील एका शेतात तिचा मृतदेह आढळून येतो. घटनास्थळी महिलेच्या सोबत मोबाईल आढळून आलेला नाही. शिवाय इतक्या रात्री महिला तिथे पोहोचली कशी? तिच्या सोबत कुणी होते का? अशा विविध गोष्टींची उकल करण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.

(अधिक माहिती मिळताच बातमी अपडेट केली जाईल)

Leave A Reply

Your email address will not be published.