विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील केसुर्ली गावात राहणाऱ्या एका विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना आज शुक्रवार 5 फेब्रुवारी दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास घडली. पूजा किसन मांढरे (26) असे आत्महत्या करणाऱ्या विवाहितेची नाव आहे. आत्महत्येचे कारण अजूनही कळू शकते नाही. मात्र हुंड्यासाठी छळ केल्यानेच मुलीने आत्महत्येचे पाऊल उचलले असा आरोप मृतकाच्या वडिलांनी केला आहे. या प्रकरणी सासरच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सविस्तर वृत्त असे की पूजा विजय नागपुरे रा. घुग्गुस हिचे दोन वर्षापूर्वी तिचे केसुर्ली गावातील किसन मांढरे याच्यासोबत लग्न झाले. शुक्रवारी 5 फेब्रुवारी रोजी तिचा पती किसन हा कामानिमित्त वणीला गेला होता. तर तिची सासू ही शेतात कापूस वेचायला गेली होती. दरम्यान दुपारी 1.30 वाजताच्या दरम्यान पूजाने आपल्या राहते घरी लाकडी फाट्याला ओढणीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.
घटना उघडकीस येताच सरपंच नामदेव टोंगे यांनी वणी पोलीसांना याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. उत्तरीय तपासणीसाठी पूजाला वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुलीने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच पूजाचे वडील विजय नागपुरे हे घुग्गुसवरून वणीला आले.
आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र पूजाचा पती किसन हा वारंवार पैशाची मागणी करीत असल्याचा आरोप पूजाच्या वडिलांनी केला आहे. या प्रकरणी हुंडाबळीची तक्रार केली जात असल्याची माहिती आहे. वृत्त लिहितपर्यत गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू होती. घटनेचा प्राथमिक तपास ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डोमाजी भादीकर करीत आहे.
हे देखील वाचा: