विलास ताजने, वणी: वणी तालुक्यातील माथोली (कैलासनगर) येथे चोरट्यांनी आज दि.१३ गुरुवारी पहाटेच्या दरम्यान चार घरे फोडली. मात्र केवळ एकाच घरून मुद्देमाल लंपास करण्यात चोरटे यशस्वी झाले. सदर घटनेची माहिती शिरपूर पोलिसांना देण्यात आली आहे. शिरपूर पोलीस ठाण्यापासून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या माथोली येथे ही घटना घडली.
आज गुरुवारी रात्री दोन ते तीन वाजताच्या दरम्यान नारायण गुंजेकर, नामदेव गुंजेकर, सूर्यभान गुंजेकर आणि नामदेव बोबडे यांच्या घरी चोरीची घटना घडली. नारायण गुंजेकर यांच्या घराचे समोरचे दार तोडले. मात्र तेवढ्यात लाईन बंद झाल्याने घरच्यांना जाग आली. यावेळी चोरटे पळून गेले. तर नामदेव गुंजेकर यांच्या घरी स्वयंपाक घरातून चोरटे शिरले. सूर्यभान गुंजेकर यांच्याही घरी दार तोडून आत गेले.
परंतु चोरट्यांच्या हाती काहीच मिळाले नाही. मात्र नामदेव बोबडे यांच्या घरची मंडळी बाहेरगावी गेली होती. त्यामुळे चोरट्यांनी सोन्याची दागिने आणि रक्कम असा अंदाजे वीस हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची माहिती आहे. ग्रामस्थांनी घाबरून चोर -चोर अशी आर्त हाक दिल्यामुळे चोरटे पळून गेले. चोरांची टोळीच असण्याचा संभव आहे.
घटनास्थळी चोरांच्या चपला, ब्लॅंकेट, स्वेटर, तंबाकू पुडी आदी साहित्य पडून होते. अशाच प्रकारे गत महिन्यात येनक येथे मोठी चोरी झाली होती. त्याचा सुगावा अध्यापही लागलेला नाही. शिंदोला परिसरात वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे