उद्यापासून चिकन, मटन, फिश विक्रीला परवानगी
जत्रा मैदानात मांस विक्री, विक्रेत्यांना देण्यात आली जागा
विवेक तोटेवार, वणी: महाराष्ट्र शासनाने काल शुक्रवारी संपूर्ण राज्यभरात मांस विक्रीला परवानगी दिली. त्यानुसार कुठेही सोशल डिस्टन्सिंगचं उल्लंघन होणार नाही याची खबरदारी घेत नगर पालिकेने मांस विक्रेत्यांना जत्रा मैदान येथे जागा उपलब्ध करून दिली आहे. यानुसार नियोजित जागी रविवारपासून सकाळी 8 ते संध्याकाळी 8 या वेळेत चिकन, मटन, फिश याची विक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
जत्रा मैदानात प्रत्येक दुकानाला 9 x 9 ची जागा देण्याात आली असून या प्रत्येक दुकानात पाच मीटरचे अंतर ठेवण्यात आले आहे. तसेच प्रत्येक ग्राहकांमध्ये अंतर असावे, यासाठी सर्कलची व्यवस्था स्वतः विक्रेत्यांना करायची आहे. विक्री करताना सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन होऊ न देणे याची खबरदारी ही विक्रेत्यांनी घ्यायची आहे. अशी माहिती नगर पालिकेच्या नियोजन विभागाचे राहुल चौधरी यांनी दिली.
मांस विक्रेत्यांची नाराजी
नगर पालिकेने जागा जरी दिली असली तरी त्यात सोयी सुविधा नसल्याने विक्रेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मांस विक्रीसाठी वीज, पाणी इत्यादीची गरज असते. मात्र त्या ठिकाणी ही व्यवस्था करणे सोयिस्कर नाही. तसेच वेस्टेजसाठीही कोणतीही व्यवस्था करण्यात आली नसल्याचा आरोप करत नाराजी व्यक्त केली.
नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई – नगराध्यक्ष
दुकानात मांस विक्री केल्यास गोंधळ उडू शकतो शिवाय सोशल डिस्टन्सिंग राखणे व त्यावर लक्ष ठेवणे प्रशासकीय दृष्या कठिण आहे. दुकानातही वीज, पाणी, वेस्टेज याची जबाबदारी विक्रेत्यांकडे असते. त्यामुळे ही व्यवस्था करणे विक्रेत्यांसाठी अशक्य नाही. त्यामुळे मांस विक्रेत्यांनी सहकार्य करावे. जर कुणीही सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केले तर त्या विक्रेत्यांवर कारवाई करून त्याचा विक्रीचा परवाना रद्द करण्यात येईल. – तारेंद्र बोर्डे, नगराध्यक्ष वणी