धुलीवंदनाची मुदत संपूनही मांसविक्रीचे दुकाने जत्रामैदानावरच

विवेक तोटेवार, वणी: मांसविक्रेत्यांनी जत्रा मैदानावरील दुकाने हटवण्यासाठी धुलीवंदनाची मुदत मागितली होती. तर मुख्याधिकारी यांनीही धुलीवंदनानंतर कार्यवाही करण्याचा इशारा दिला होता. मात्र धुलीवंदन संपल्यानंतरही ना मांसविक्रेत्यांनी दुकाने हटवली, ना मुख्याधिकारी यांनी कुणावर कार्यवाही केली. त्यामुळे दुकाने हटवण्याची मागणी केलेल्या भाविकांच्या पदरी मात्र निराशा आली आहे. दरम्यान युवासेनेतर्फेही अजिंक्य शेंडे यांनी निवेदन देऊन दुकाने हटवण्याची मागणी करण्यात आली होती.

वणीतील रंगनाथ स्वामींची जत्रा परिसरात प्रसिद्ध आहे. होळीपासून सुमारे 1 ते दीड महिना चालणारी ही जत्रा काळाच्या ओघात अवघ्या काही दिवसांवर आली आहे. त्यातच कोरनामुळे गेल्या 3 वर्षांपासून जत्रा बंद होती. मोठ्या कालावधीनंतर ही जत्रा सुरू होणार असल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. भाविकांनी जत्रामैदानावर असलेले मांसविक्रीचे दुकाने हटवण्याची मागणी मुख्याधिकारी यांच्याकडे केली होती.

सदर दुकाने ही जत्रा मैदानासाठी राखीव असलेल्या जागेवर (नगर पालिकेची जाग) आहेत. उघड्यावर मांसविक्रीला शासनाने बंदी आणल्याने नगरपालिकेने जत्रा मैदानाच्या शेजारी असलेल्या लालगुडा तलावाजवळ मांसविक्रीसाठी कॉम्प्लेस बांधले आहे. मात्र मांसविक्रेते या ठिकाणी जाण्यास उदासिन आहे. जत्रा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर काही भाविकांनी या भागातील मांसविक्रेत्यांनी त्यांचे दुकान काही काळासाठी इतरत्र हलवण्याची मागणी केली होती.

त्याला प्रतिसाद देत मटन विक्रेत्यांनी आपले दुकाने हटवले, मात्र काही चिकन व्यावसायिकांनी आधी आपले दुकाने हटवण्यास नकार दिला. मात्र प्रकरण वाढू नये म्हणून त्यांनी धुलीवंदनाचा दिवस व्यवसाय करू द्यावा व त्यानंतर दुकाने हटवणार अशी भूमिका घेतली होती. तर मुख्याधिकारी यांनी देखील धुलीवंदनाच्या दुस-या दिवशी कठोर कार्यवाही केली जाणार असा इशारा दिला. मात्र 8 तारखेला ना प्रशासनाने दुकाने हटवण्यासाठी काही कार्यवाही केली गेली ना मांसविक्रेत्यांनी आपले दुकाने हटवले. त्यामुळे मांसविक्रीचे दुकाने हटणार की नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

प्राप्त माहितीनुसार नगरपालिकेत 8 मार्च रोजी महिला दिन साजरा करण्यात आला. त्यातच पालिकेचे प्रशासक असलेले तहसिलदार यांचा वाढदिवसही होता. या कार्यक्रमात सर्व हजर असल्याने जत्रा मैदानावरील कार्यवाहीकडे दुर्लक्ष झाल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे इशारा देऊनही दुकाने न हटल्याने भाविकांच्या पदरी निराशा पडल्याचे दिसून येत आहे.

युवासेनेचे मांसविक्रीचे दुकाने हटवण्यासाठी निवेदन
जत्रेसाठी राखीव असलेल्या जागेवरील मांस विक्रीचे दुकाने तात्काळ हटवावे यासाठी दि. ६ मार्च राजी मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांच्याकडे युवासेनेचे अजिंक्य शेंडे यांच्या नेतृत्त्वात निवेदन सादर करण्यात आले. यावेळी मिलिंद बावणे, विशाल घाटोळे, दुर्व येरणे, अमृत फुलझेले, अभिजित सुरकुरे, सिनु दासारी, राजु वाघमारे, चेतन उलमाले, आशु ठाकुर, अभिषेक मेश्राम, युवराज तुराणकर, आसिफ अली, गौरव तारकोंडावार, आदर्श गुरफुडे इत्यादी युवासेनेचे सैनिक उपस्थित होते.

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.