महिलांनी चुल आणि मुल यातून बाहेर निघावे: कॉ. दानव

0

महेश लिपटे, वणी: आजही समान कामासाठी वेतन देताना स्त्री आणि पुरुषांमध्ये भेदभाव केला जातो. चुल आणि मुल यातून बाहेर निघून महिलांनी स्वतंत्रपणे कर्तबगारी दाखवावी. असे प्रतिपादन कॉ. शंकरराव दानव यांनी मेंढोली येथे केले. माक्सवादी कम्युनिस्ट पक्ष व जनवादी महिला संघटनेच्या वतीने मेंढोली येथे 10 मार्चला महिला दिन तसेच क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी कॉ. शंकरराव दानव बोलत होते.

सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर प्रमुख वक्ते कॉ. शंकरराव दानव आणि कॉ. कुमार मोहरमपुरी यांचे व्याख्यान झाले. स्त्री ही उत्पादन कार्यामध्ये कमी वेतनावर तर काम करतेच पण त्याच बरोबर परिवारिक कार्यामध्ये अग्रस्थानी राहून स्वतःला झोकून देते. हे करीत असताना मात्र ती स्वतःकडे दुर्लक्ष करून कुपोषित जगताना दिसते. एवढं सगळं दिसतानाही समाज पदोपदी तिचा अपमान करताना व तिच्यावर वेगवेगळी बंधने घालताना दिसते आहे. जगामध्ये पहिल्यांदा रशिया मध्ये लेनिनच्या नेतृत्वात झालेल्या समाजवादी व्यवस्थेमध्ये स्त्रियांना चूल आणि मूल सोडून महिलांना स्वातंत्र्यपणे कर्तबगारी दाखविण्याची संधी देऊन स्त्री व पुरुषांना घराचा कार्यातही समान वाटा घालून दिला गेला. असे विचार कॉ. शंकरराव दानव यांनी मांडले.

प्रसंगी कॉ. कुमार मोहरमपुरी म्हणाले की भारतामध्ये महात्मा फुले व सावित्रीबाई फुले या दाम्पत्यांनी धर्माचे व धर्मग्रंथांचे जोखड झुगारून स्त्रियांना शिक्षणाची दारे मोकळी करून त्यांची समान संधिकडे वाटचाल सुरु करून दिली. तेव्हा जागतिक महिलादिन साजरा करीत असताना भारतीय पटलावर फुले दाम्पत्यांचे महत्व आहे.

या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून कॉ शंकरराव दानव व कॉ कुमार मोहरमपुरी हे होते. तर अध्यक्षस्थानी कॉ मंदाबाई कुळमेथे ह्या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून जनार्दन पाटील वासेकर, शांताबाई वालकोंडे, अनिताबाई ढवस, पार्वताबाई पेंदोर, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण कुळमेथे हे होते. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात महिलांनी हजेरी लावली होती.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.