वणीच्या रेडलाईट एरियातून अल्पवयीन मुलीची सुटका
शिक्षणाचं आमिष दाखवून नवी दिल्लीतून आणलं होतं वणीत़
विवेक तोटेवार, वणी: बळजबरीने देहव्यापारात ढकललेल्या एका अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी दोन महिलांना अनैतिक मानव व्यापार प्रतिबंधक विभाग व नागपूर येथील एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून अटक केली आहे.
रचना (नाव बदललेले) हि सोळा वर्षीय तरुणी युवतीला नवी दिल्ली येथील राजगड इथली रहिवाशी आहे. मध्यप्रदेशातील दोन महिला रचनाच्या संपर्कात आल्या होत्या. या महिलांनी तिला शिक्षणासाठी बाहेर घेऊन जातो अशी बतावणी करून तिला पळवून आणले. तिला वणीतील प्रेमनगर येथे देवव्यापाराच्या व्यवसायात अडकविले.
या प्रकरणाची माहिती पोलीस निरीक्षक संजय दामोदर डहाके अनैतिक मानव व्यवसाय प्रतिबंधक कक्ष यवतमाळ याना मिळाली. डहाके यांनी क्षणाचाही विलंब न करता नागपूर येथील स्वयंसेवी संस्था फ्रीडम फर्म यांना संबंधित घटनेची माहिती दिली. मिळालेल्या माहितीवरून फ्रीडम फर्मचे स्वयंसेवक जॉय देव मसिह यांनी काही महिला स्वयंसेविका ज्यामध्ये आशा उत्तमराव लोखंडे, भारती बाळकृष्ण काटोले, शिल्पा निलेश वानखेडे यांना सोबत घेतले व यावतमाळच्या दिशेने निघाले.
यवतमाळ पोचताच त्यांनी ए एस आय कैथवास, पो हे का. दोडके व ना को पा भिसे यांना सोबत घेतले व 28 नोव्हेंबर ला दुपारी 2.50 वाजता वणीच्या दिशेने निघाले. वणी पोहचताच त्यांनी प्रेमनगर येथे परताळणी करण्यास सुरुवात केली. या ठिकाणी मुखबिरने सांगितल्या प्रमाणे एक घर दिसून आले. त्या ठिकाणी एक महिला खुर्चीवर बसून होती. तिला नाव विचारले असता बबिता हे नाव सांगितले. यावरून सर्व टीम ला माहिती झाली की आपण योग्य मार्गावर आहोत. त्यांनी त्या घराची तपासणी केली. त्या ठिकाणी एक 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी मिळाली.
तिला नाव गाव विचारून पोलिसांच्या व महिला स्वयंसेवकांच्या मदतीने या तिघीनाही ताब्यात घेतले. दोन महिला रेखा व बबिता यांच्यावर कलम 3, 4 अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा व कलम 363, 366 (अ), 370 (4), 370 (अ), (1) भादवी नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास वणीचे ठाणेदार बाळासाहेब खाडे करीत आहे.
तालुक्यात देहव्यापार व्यवसाय मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. यामध्ये अनेक युवती भरडल्या जात आहे. दोन महिन्या अगोदर अशा एक देहव्यापरात ढकलल्या गेलेल्या युवतीची वणी पोलिसांनी सुटका केली होती.