‘त्या’ कथित वक्तव्याबाबचे वृत्त तथ्यहिन व खोडसाळ !

तारेंद्र बोर्डे व आ. बोदकुरवार यांनी केले वृत्ताचे खंडन

बहुगुणी डेस्क, वणी: भाजपच्या एका कार्यकर्त्याने कुणबी समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे वृत्त एका न्यूज पोर्टलवर पब्लिश झाले होते. त्याचे पडसाद सोशल मीडियातून पडायला सुरुवात झाली. या प्रकरणावर संध्याकाळी भाजपतर्फे पत्रकार परिषदेतून प्रतिक्रिया देण्यात आली. ‘ते’ वृत्त खोडसाळ आहे, अशी स्पष्टोक्ती तारेंद्र बोर्डे यांनी दिली. तर घटनास्थळी असे काही घडलेच नाही. दोन कार्यकर्त्यांतील हा वैयक्तिक वाद होता, सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजबांधवात तेढ निर्माण करण्याचे हे राजकीय षडयंत्र आहे, असे आ. संजीवरेड्डी यांनी या प्रकरणी स्पष्ट केले. संध्याकाळी 8 वाजता भाजपच्या कार्यालयात आमदार संजीवर रेड्डी बोदकुरवार यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत त्यांनी या प्रकरणावर पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकार परिषदेत आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्यासह तारेंद्र बोर्डे, दिनकर पावडे, संजय पिंपळशेंडे, गजानन विधाते, रवि बेलुरकर, संतोष डंभारे यांच्यासह कुणबी समाजाचे भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

आ. संजीवरेड्डी बोदकुरवार म्हणाले की सोमवारी दिनांक 4 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी भाजपच्या कार्यालयात दोन कार्यकर्त्यांमध्ये वैयक्तिक वाद झाला. वाद वाढल्याचे दिसताच तारेंद्र बोर्डे हे मध्यस्थी करण्यासाठी पुढे आले व त्यांनी वाद सोडवला. मात्र दुस-या दिवशी एका पोर्टलवर कुणबी समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची बातमी प्रकाशीत झाली. त्यामुळे समाजबांधवांच्या भावना दुखावल्या. मात्र सदर वृत्त हे तथ्यहिन व खोडसाळ आहे. हे वृत्त प्रकाशीत करून वैयक्तिक वादाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करण्यात आला. वृत्त प्रकाशित करणा-या न्यूज पोर्टलचालकावर मानहानीचा गुन्हा दाखल करणार आहे, भाजपमध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहेत. पक्षात अनेक कुणबी पदाधिकारी व कार्यकर्ते आहेत. त्यांच्या एकजुटीने भाजपच्या लोकप्रियतेत वाढ झाली आहे. असेही ते पत्रकार परिषदेत म्हणाले.

शहरात पडले कथित वक्तव्याचे पडसाद
मंगळवारी दुपारच्या सुमारास एका पोर्टलवर ‘त्या’ कथित वक्तव्याबाबत वृत्त प्रकाशित झाले. या वृत्तामुळे कुणबी समाजबांधवांमध्ये खळबळ उडाली. याबाबत संध्याकाळी मिटिंग घेण्यात आली. त्यानंतर कुणबी समाजातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सामाजिक संघटनेचे कार्यकर्त्यांनी वणी पोलीस ठाण्यात धडक दिली. त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य करणा-याविरोधात तात्काळ गुन्हे दाखल कऱण्याची मागणी केली. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरु होती, अशी माहिती आहे. 

Comments are closed.