जब्बार चीनी, वणी: वणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. बुधवारी 23 सप्टेंबर रोजी त्यांची कोरोनाची टेस्ट पॉझिटीव्ह आली. सध्या त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहे. त्यांचा संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना टेस्ट करून स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केले आहे.
सोमवारी दिनांक 21 सप्टेंबर रोजी आमदार बोदकुरवार यांना ताप जाणवला. हलका ताप असल्याने त्यांनी त्याला गांभीर्याने घेतले नाही. मात्र त्यांनी मंगळवारी वणीत डेंग्यू आणि मलेरियाची चाचणी केली. त्यात काहीही निष्पन्न झाले नाही. ताप असल्याने त्यांनी तातडीने नागपूर येथे उपचारासाठी जाण्याचा निर्णय घेतला.
काल बुधवारी ते नागपुरच्या सेवनस्टार हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. तिथे त्यांनी कोरोनाची चाचणी केली. ती पॉजिटिव्ह आली. त्यामुळे पुढील 3 ते 4 दिवस ते हॉस्पिटलमध्ये उपचार घेणार व त्यापुढचे 14 दिवस ते होम क्वारंटाईन राहणार आहे.
संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोनाची टेस्ट करावी: आ. बोदकुरवार
सध्या माझी तब्येत ठिक असून काळजी करण्यासारखे कोणतेही कारण नाही. मात्र गेल्या आठवड्यापासून जे लोक माझ्या संपर्कात आले आहे. त्यांनी खबरदारी म्हणून चाचणी करून घ्यावी. सध्या काही दिवस उपचार घेत असल्याने नागरीकांनी अतीआवश्यक कामासाठी पीएशी संपर्क करावा.
– आ. संजीवरेड्डी बोदकुरवार
वणी तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. वणी तालुक्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 577 वर पोचली आहे. तर 15 रुग्णांचा कोरोनामुळे अंत झाला आहे. वणीमध्ये दिवसाला किमान 15 रुग्ण आढळत असल्याने परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. अनलॉकनंतर सर्वत्र व्यवहार सुरळीत सुरु झाले आहेत. त्यामुळे नागरिकांची प्रचंड गर्दी दिसत आहे. कोरोना जगातून नाहीसा झाला आहे असाच समज करुन नागरिकांनी घेतला असल्याचे होणा-या गर्दी वरुन दिसून येते. परिणामी कोरोना रुग्णांची वाढ झपाट्याने वाढत आहे.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)