उद्या वणी तहसील कार्यालयावर ‘आर या पार’ मोर्चाचे आयोजन

शेतक-यांच्या प्रश्नांवर मनसे आक्रमक, राजू उंबरकर यांच्या नेतृत्त्वात निघणार विराट मोर्चा

जितेंद्र कोठारी, वणी :  राज्यात शेतकऱ्यांची दयनीय अवस्था, शेतकरी आत्महत्या, शेतकऱ्यांना 24 तास वीज पुरवठा, पीक विम्याचा नावावर शेतकऱ्यांची होणारी फसवणूक इत्यादी प्रश्नांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिंदे – फडणवीस सरकारच्या विरोधात ‘आर या पार” लढाईची घोषणा केली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशाने मनसे प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्या नेतृत्वात शुक्रवार 20 जानेवारी रोजी वणी विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

गेल्या वर्षभरात विदर्भात दीड हजारांच्यावर शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन संपविले. ओला दुष्काळ असूनही पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली. कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांच्या मुलं मुलींचे लग्न जुळण्यात अडथळा निर्माण होत आहे. ओल्या दुष्काळात खरीप हंगाम शेतकऱ्याच्या हातातून निसटला. शिवाय आता दिवसा वीज मिळत नसल्याने रब्बी हंगामही संकटात आहे. अशा स्थितीत सरकारने ठोस पावलं उचलली नाही तर विदर्भात आणखी हजारो शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील परिस्थिती तर आणखी भीषण आहे. त्यामुळे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी ‘आर पार’ मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात हजारो शेतकरी, बेरोजगार, विद्यार्थी यवतमाळ जिल्ह्यातील वणीत रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती राजू उंबरकर यांनी दिली आहे.

एकीकडे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात झालेल्या भेटीनंतर शिंदे – फडणवीस सरकारशी मनसेची जवळीकता वाढत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. शिवाय मनसे भाजप युतीचे सुतोवाच देखील केले जात होते. मात्र आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून मनसेने सरकार विरोधातच मोर्चा उघडल्याने याची चांगलीच चर्चा होत आहे.

Comments are closed.