प्रभाग क्र. 11 मध्ये समस्यांचा डोंगर, अंकुश बोढे यांनी फोडली वाचा
पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, पथदिवे इ. समस्येबाबत पालिकेला निवेदन
बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील प्रभाग 11 मधील नागरिकांच्या दैनंदिन अडचणीं बाबत मनसेने आवाज उठवला आहे. पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था आणि प्रकाशव्यवस्था यांसारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित नागरिकांच्या समस्या घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष अंकुश बोढे यांनी थेट नगरपालिकेच्या दारात धडक दिली. नागरिकांचा आवाज बनत त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधत या सर्व समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. मंगळवारी दिनांक 4 नोव्हेंबर रोजी मनसेतर्फे निवेदन देण्यात आले.
प्रभाग क्रमांक 11 मध्ये विविध समस्यांचा डोंगर आहे. या समस्यांकडे पालिका प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. रंगारी पुरा येथील काही घरी पाणी समस्या आहे. शेजारच्या घरी पाणी येते मात्र काही घरांना पाणी नाही, अशी परिस्थिती काही भागात आहे. याच भागात दर्ग्याजवळ लाईट नसल्याने येथे अंधाराचे साम्राज्य आहे. येथे सोलर लाईट बसवण्याची मागणी अंकुश बोढे यांनी केली आहे. तर महांकाली मंदिराजवळील भागात नालीचे बांधकाम झालेले नाही. हे बांधकाम कधी होणार असा सवाल अंकुश बोढे यांनी पालिका प्रशासनाला विचारला.
सर्वोदय चौक येथील कोंडेवार यांच्या घराजवळील रस्ता हा कटलेला आहे. त्यामुळे वाहन चालकांना कसरत करत जावे लागते. तसेच रोड कटल्याने येथे छोटेमोठे अपघात होणे नित्याचीच बाब झाली आहे. याच चौकातील वळणावर मोठा गड्डा पडला आहे. हा खड्डा अपघातांना आमंत्रण देत आहे. त्यामुळे कटलेला रस्ता तातडीने दुरुस्त करावा व वळणावरचा खड्डा बुजवावा, अशी मागणी अंकुश बोढे यांनी केली आहे.
निवेदन देते वेळी उपशहराध्यक्ष कृष्ण निमसटकार, शहर सचिव शंकर पिंपळकर यांच्यासह मनसेचे सूरज पळसकर, आशिष चतुर, अहेमद रंगरेज, स्वयम ठाकरे, प्रवीण बोथरा, सुजल तिवारी, नवीन पिंपळकर, प्रज्योत टांगे आदी उपस्थित होते. अंकुश बोढे हे गेल्या काही महिन्यांपासून शहरातील विविध प्रभागात जाऊन समस्या जाणून घेत आहेत. तसेच या समस्या सोडवण्यासाठी पालिकेला निवेदन देत त्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करीत आहे. बोढे यांच्या पाठपुराव्यामुळे अनेक समस्या सुटल्या आहेत.



Comments are closed.